बंगाली निर्माता, दिग्दर्शक मराठी चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त

पश्चिम बंगालचं वैभव पहाण्याची संधी दिग्दर्शक शोभो बासू नाग आणि निर्माते प्रीतम चौधरी, विकी शर्मा सहयोगी निर्माते त्यांच्या ‘फॅटफिश एन्टरटेन्मेन्ट’ प्रस्तुत ‘अवांछित’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना लवकरच देणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पश्चिम बंगालच्या जुन्या आणि नव्या कोलकाता शहरात सुरु झाले आहे.

‘अवांछित’मध्ये नव्या आणि जुन्या कोलकाताची रूपकात्मक कथा दिसणार असून ती वडील मधुसूदन गव्हाणे आणि मुलगा तपन गव्हाणे यांच्या नात्याप्रमाणे विभागली आहे. वृध्दाश्रमातल्या नोकरीत गुंतलेल्या मधुसूदन यांचं नकळत त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते आणि त्यामुळेच आईने जीव गमावल्याची भावना मनात बाळगून तारुण्यात पदार्पण करणारा तपन त्यांच्याशी खटकून वागू लागतो. बापलेकातला दुरावा वाढत जातो. त्यांच्या भावविश्व, नातेसंबंधांची वीण कधी घट्ट तर कधी सैल होत जाते. कसलेल्या मराठी कलावंतांसोबत निर्माण होणाऱ्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी बंगाली कलावंतांनीही कंबर कसली आहे. मराठी प्रमुख कलावंतांसोबतच पडद्यामागील बहुतांश कलावंत बंगाली आहेत.

अतुल जगदाळे डीओपी बरोबरच क्रिएटिव्ह प्रोड्युसर सुद्धा आहेत. या चित्रपटात अभिनेते किशोर कदम एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असून अभिनेता अभय महाजन व मृण्मयी गोडबोले या तरुण जोडगोळीसोबतच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, योगेश सोमण यांसह बंगाली अभिनेते बरून चंदा प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

कोलकाता शहरात संपूर्ण चित्रित होणारा ‘अवांछित’ हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे. दिग्दर्शक शोभो बासू नाग यांच्या मूळ कथेवर ‘अवांछित’ बेतला असून त्यावर पटकथा व संवाद निर्मिती योगेश जोशी यांनी केली आहे. ओंकार कुलकर्णी यांनी रचलेल्या गीतांना बंगाली संगीतकार अनुपम रॉय यांनी संगीत दिले आहे.

हा चित्रपट मराठी असला तरी कथेचा संदर्भ कोलकाताशी आहे. जुन्या आणि नवीन कोलकाताची गोष्ट या चित्रपटात असून ती मराठी प्रेक्षकांना निश्चित आवडेल आणि ते या चित्रपटासोबतच पश्चिम बंगालच्याही प्रेमात पडतील, अशी प्रतिक्रिया या चित्रपटाचे डीओपी व क्रिएटिव्ह प्रोड्युसर अतुल जगदाळे यांनी दिली.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns