*बाप- लेकीच्या नात्याची ‘द्विधा’*
बाप आणि लेक हे नातं शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं. आईच्या कुशीत माया तर वडिलांच्या सावलीत सुरक्षिततेचा आधार असतो. आपल्या लेकीच्या आनंदासाठी झटणारा बाप आणि संकटात वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी लेक, हे नात्याचं सर्वात सुंदर रूप असतं.
‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटातही बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार व हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे. ‘फादर्स डे’चं औचित्य साधत ‘द्विधा’ चित्रपटाचे भावस्पर्शी पोस्टर आणि टिझर प्रदर्शित करण्यात आला असून येत्या २१ ऑगस्टला हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांचे आहे. निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत.
नात्यांमधली ‘द्विधा’ ही फक्त निर्णयांची नव्हे, तर भावनांचीही लढाई असते. विश्वास आणि अपेक्षा यांच्या मधोमध उभं राहिलेलं मन कधी स्वतःसाठी, तर कधी समोरच्यांसाठी झुकतं. ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांच्या प्रभावी भूमिकांतून ‘द्विधा’ बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या दोघांसोबत रेणूका दफ्तरदार, निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर, ओवी तानवडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.
‘द्विधा’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात येणाऱ्या भावनिक संघर्षाची कहाणी आहे. आयुष्यात एखादी वेळच अशी येते की, मन ‘द्विधा’ अवस्थेत अडकतं. ही भावना अत्यंत संवेदनशीलतेने पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. फादर्स डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेला हा टिझर प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल, असा विश्वास दिग्दर्शक निलेश नाईक यांनी व्यक्त केला.
‘द्विधा’ चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, संकलन निलेश नाईक यांनी केले आहे. चित्रपटातील गीते गीतकार मंगेश कांगणे, मंदार चोळकर यांची असून संगीताची जबाबदारी निलोत्पल बोरा आणि शैलेंद्र बर्वे यांनी सांभाळली आहे. निलोत्पल बोरा यांनी नेटफ्लिक्ससाठी अनेक लोकप्रिय वेब सिरीज आणि प्रकल्पांवर काम केले आहे. हंसिका, परीक, मयुरी पटवर्धन यांचा स्वरसाज गाण्यांना लाभला आहे. छायांकन सिमरजीत सुमन, अश्विनी पाखरोट,श्रीधर अल्ले यांचे आहे वेशभूषा विदुला आजगावकर यांची आहे. ध्वनीरचना इक्रामुद्दीन रुस्तम लोचूर तर ध्वनीमिश्रण योगेश कारभारी नेहे, आकाश स्वजन सेनगुप्ता यांनी केले आहे.






























