प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची एक अद्भुत कहाणी ‘असंभव’
मराठी चित्रपटसृष्टीत सस्पेंस, मिस्ट्री या जॅानरची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून असाच एक रहस्यांनी भरलेला ‘असंभव’ हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये दिसणारी थरारक दृश्यं, गूढ वातावरण यामुळे हा चित्रपट रहस्यपट असल्याचा अंदाज येतोय. मात्र या सगळ्यामागे नक्की काय रहस्य दडले आहे, याचा उलगडा येत्या २१ नोव्हेंबरलाच होणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन सचित पाटील आणि पुष्कर सुधाकर श्रोत्री यांनी केलं आहे.
मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे,प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले असून त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवण्याची संधी या चित्रपटात प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण नैनीतालच्या गोठवणाऱ्या थंडीमध्ये करण्यात आलं असून नैनितालमध्ये चित्रीत झालेला हा पहिला मराठी चित्रपट आहे.
दिग्दर्शक सचित पाटील आणि पुष्कर श्रोत्री म्हणतात, ” ‘असंभव’ ही अशी एक कथा आहे, जी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल. यात थरार आहे, भावना आहेत, प्रेमकहाणी आहे आणि गूढतेने भरलेली रचना आहे. हा चित्रपट लोकांच्या मनात खोलवर उतरावा, यासाठी आम्ही प्रत्येक फ्रेमसाठी मेहनत घेतली आहे.”




























