बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या ‘द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ या बॅनरखाली येऊ घातलेल्या ‘मन उधाण वारा’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले. या चित्रपटाच्या निमित्ताने सतीश कौशिक मराठी चित्रपटसृष्टीत निर्माते म्हणून पदार्पण करतायेत. ‘द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ आणि ‘लोका एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ‘पेन मुव्हीज्’चे जयंतीलाल गडा यांच्या प्रस्तुतीखाली ‘मन उधाण वारा’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
मोनल गज्जर, रित्विज वैद्य या नव्या जोडीसह किशोर कदम, उत्तरा बावकर, सागर कारंडे, शर्वरी लोहकरे, डॉ.शरद भुताडिया, विनोद कुलकर्णी, भारती पाटील, वैभव राजाध्यक्ष, साक्षी गांधी, ज्युलिया मोने, अनुराधा अटलेकर या कलाकारांच्या ‘मन उधाण वारा’ या चित्रपटात भूमिका आहेत. निशांत कौशिक, अक्षय गडा, धवल गडा चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. छायांकन मिलिंद जोग तर संकलन कृष्णत घार्गे यांचे आहे.
‘आयुष्यावर प्रेम करा ते तुम्हाला भरभरुन देतच असतं. अनुभवातून बऱ्याच गोष्टींकडे आपण वेगळ्या दृष्टीने आणि वेगळ्या प्रकारे जाणीवांच्या पलिकडे पाहू शकतो’, हे प्रेमकथेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न ‘मन उधाण वारा’ या चित्रपटातून केला असल्याचे दिग्दर्शक संजय मेमाणे सांगतात.
आशयाच्या बाबतीत मराठी चित्रपट कायमच समृद्ध राहिला आहे. या समृद्धतेमुळे अनेक चांगले विषय मराठीत पहायला मिळतात एक वेगळा दृष्टीकोन देणारा ‘मन उधाण वारा’ चित्रपट प्रत्येकाला नक्कीच भावेल असा विश्वास सतीश कौशिक यांनी याप्रसंगी व्यक्त केला































