ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार (87) यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार प्रदीर्घ काळापासून आजारी होते. प्रकृती अस्वास्थामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. मनोज कुमार देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी केलेल्या देशभक्तीपर चित्रपटांमुळेच त्यांना बॉलिवूडमध्ये ‘भारत कुमार’ म्हणून ओळख मिळाली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

मनोज कुमार यांना 1992 मध्ये पद्मश्री आणि 2015 मधे दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. राजा खोसला यांचा 1964 मधला मिस्ट्री थ्रिलर असलेला ‘वो कौन थी?’ मनोज कुमार यांचा सुपरहिट ठरला. या चित्रपटातील ‘लग जा गले’ आणि ‘नैना बरसे रिमझिम’ ही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. ही दोन्ही गाजलेली गाणी लता मंगेशकर यांनी गायली होती.

 

*देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनोजकुमार यांना श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका महान व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या या अष्टपैलू आणि भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात  म्हटले आहे.

 

‘शहीद’ मध्ये भगतसिंग साकारून मनोजकुमार हे देशाला सुपरिचित झाले. त्यानंतर शेतीसारखा विषय त्यांनी चित्रपटातून हाताळला आणि ‘मेरे देश की धरती’ सारखे गीत आजही प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला त्याच अभिमानाने ऐकले जाते. त्यांच्या ‘पुरब और पश्चिम’ सारख्या चित्रपटांनी तर जागतिक पातळीवर अनेक विक्रम प्रस्थापित केले. ‘रोटी कपडा और मकान’ सारख्या चित्रपटांनी त्यांनी सामाजिक विषयांना हात घातला. उपकार, क्रांती असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले. त्यांनी आपल्या प्रत्येक कलाकृतीतून देशप्रेमाची आणि राष्ट्रीयत्वाची भावना रुजवण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणार नाही. मनोजकुमार यांनी दिग्दर्शन, पटकथा-गीत लेखन, संकलन या क्षेत्रातही काम केले. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि कोट्यवधी चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी मी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

IPRoyal Pawns