त्या मुलींना त्या अवस्थेत तिथे सोडले असते तर…..पिट्या भाई अर्थात रमेश परदेशी.

त्या मुलींना त्या अवस्थेत तिथे सोडले असते तर…..पिट्या भाई अर्थात रमेश परदेशी.

सचिन चिटणीस – मुंबईन्यूज२४x७

“काय सांगू नेहमीप्रमाणे मी वेताळ टेकडीवर संध्याकाळी धावावयास गेलो होतो. धावता-धावता मला एके ठिकाणी दोन ते तीन सतरा ते अठरा वर्षाच्या मुली व एक मुलगा दिसला. बघता क्षणी मला काहीतरी गडबड आहे हे जाणवले म्हणून मी थोडे जवळ जाऊन बघितले तर दोन मुली नशेत होत्या एक तर बेशुद्धच पडली होती, असे वाटत होते. त्यांना बघितले आणि माझ्या हृदयात कालवा कालव झाली डोळ्यात टचकन पाणी आले या मुली अशा नशेत आणि आडोशाला होत्या, थोड्या वेळात अंधार होणार होता मग यांचे कसे होणार यांच्या बाबतीत काही अघटीत घडले तर… मला एकदम माझ्या मुलीची आठवण आली या मुली तिच्याच वयाच्या होत्या.

तोपर्यंत माझ्या आजूबाजूला ,५० ते ६० जणांचा घोळका जमला होता. त्यात काही बायकाही होत्या तेथीलच दोन तरुणांना जशी जमेल तशी बाईक घेऊन ये म्हणून सांगितले कारण आम्ही अशा ठिकाणी होतो जिथे बाईक येणे हे देखील दिव्य होते. मी महिलांना विनंती केली मुली आहेत तेव्हा तुम्ही त्यांना खालच्या रस्त्यापर्यंत घेऊन आलात तर बरे होईल मात्र मला तेथील कोणत्याही नागरिकांनी अथवा महिलांनी मदत केली नाही. हे माझ्या पुण्यात घडते हे बघून मी खिन्न झालो. कसंतरी मुलींना खालच्या रस्त्यावर जिथे आमच्या मित्राची कार उभी होती तिथपर्यंत आणले व त्यांना कार मध्ये बसवून प्रथम पोलीस स्टेशनला नेले तेथून दोघींना शुश्रुषा हॉस्पिटलमध्ये नेले. एक मुलगी जरा ठीक होती दुसरीचा बीपी लो झाला होता. म्हणून  कार्डियाक ॲम्बुलन्स करून रात्रौ साडेअकरा वाजता तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा ती शुद्धीवर आली. आज काल पुण्यात बाहेर गावाहून हजारो लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी आले आहेत. तिथे त्यांच्या आई-वडिलांना काय माहित आपली पोरं इथे काय करतायेत ते बिचारे कमवून त्यांना शिक्षणासाठी पाठवतात.

तरुणांमध्ये सध्या जे फन टाईम, माय टाईम, वाईन टाईम ही संस्कृती पसरली आहे ती फारच भयानक आहे. पुण्यात बुधवार व शनिवार ८० ते ९० % मुलं मुली कुठल्या ना कुठल्या पब मध्ये अथवा डिस्को मध्ये असतात. पुण्यात नुकतेच साडेचार हजार कोटी रुपयांचे ड्रग सापडले आहे आणि हे तीन वर्षापासून चालू आहे. म्हणजे त्यांनी किती ड्रग डिस्ट्रीब्यूट केले असेल याचा विचार करा. बरं हे प्रकरण कॉलेजमधील मुलांमध्येच नाही तर शाळकरी मुलांपर्यंत देखील पोहोचले आहे. त्यांच्या दप्तरात गांजासारखे पदार्थ सापडत आहेत. आपण या शहरातील एक नागरिक व पालक म्हणून आपली डोळे उघडे ठेवून फिरू शकत नाही का? मान्य आहे प्रत्येक माणूस प्रतिकार नाही करू शकत निदान पोलिसांपर्यंत माहिती तर पोचवा आता नागरिक व पालकच हे थांबवू शकतात नाहीतर उद्या ही बिमारी आपल्या घरात कधी शिरेल याचा पत्ताही लागणार नाही मी व्हिडिओ केल्यावर दहा वेळा विचार केला समाज माध्यमावर टाकू की नको पण टाकला नसता तर त्याची दाहकता, वास्तव लोकांना कळले नसते.

मुलांमध्ये फक्त आणि फक्त चंगळवाद पसरला आहे कोणतेही टेन्शन, कॉम्पिटिशन वगैरे काही नाही ही नुसती पळवाट आहे. एकदा करून बघू हेही एक कारण आहे ‘उडता पंजाब’ या चित्रपटात दाखवले आहे तीच परिस्थिती हळूहळू महाराष्ट्रात होऊ लागली आहे आपण सर्वांनी जर डोळे उघडे ठेवून वावरलो नाही तर या शहराची वाताहात नक्की आहे”

मुंबईन्यूज २४x७ शी मुळशी पॅटर्न या चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी उर्फ पिटिया भाई बोलत होते.

+1
1
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns