सामाजिक अस्थिरतेमुळे १००व्या नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ पुढे ढकलली
येत्या ५ नोव्हेंबरला सांगली येथे १०० व्या नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते तसेच अ. भा. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले व इतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यां समवेत ही मुहूर्तमेढ रोवली जाणार होती. मात्र एकूणच मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या सामाजिक अस्थिरतेचा परिणाम शंभराव्या नाट्य संमेलनाच्या नियोजित कार्यक्रमावर झाला असून, नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्याचा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
सांगलीतील भावे नाट्यगृहामध्ये संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, पण सध्याची अस्थिर परिस्थिती लक्षात घेता ते करणे शक्य होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ५ नोव्हेंबरला झाडाची फांदी लावून मुहूर्तमेढ करण्यात येणार होती. जब्बार पटेल यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार होता. त्यानंतर अध्यक्षांसह काही सदस्यांची भाषणे होणार होती. पुढील कार्यक्रमाची आखणीही करण्यात येणार होती, पण इतर सदस्यांशी चर्चा करून मुहूर्तमेढ रोवण्याचा सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शंभरावे संमेलन कुठे आणि कधी होणार याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून हे शंभरावे नाट्य संमेलन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साकार करण्याचा विचार सुरू असल्याचेही दामले म्हणाले.
सुधीर गाडगीळ यांचा राजीनामा
आमदार सुधीर गाडगीळ यांनी संमेलन स्वागताध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. सुधीर गाडगीळ म्हणाले की,”मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असेलल्या आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. राज्य सरकार टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी प्रत्यनशील आहोत. अशा परिस्थितीत स्वागताध्यक्षपद भूषवणे योग्य वाटत नाही”.