विजयी भव युवा पुरस्कार २०२३’ राहूल भंडारे यांना प्रदान
ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ ,समुपदेशक आणि कलाउपासक *प्रा. विजय जामसंडेकर सरांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ दिला जाणारा पहिला ‘विजयी भव युवा पुरस्कार २०२३’ प्रसिद्ध प्रयोगशील नाट्यनिर्माते मा. राहूल भंडारे यांना प्रदान करण्यात आला . *
सिंपन प्रतिष्ठान, मुंबई द्वारे नुकताच हा पुरस्कार राहुल भंडारे यांना सिंधुदुर्ग येथे प्रदान करण्यात आला .
राहुल भंडारे यांनी नाट्य क्षेत्राचा कोणताही अनुभव पाठीशी नसतांना नाटक क्षेत्रामध्ये एक नाट्य निर्माता म्हणून उभं राहण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि या क्षेत्रात स्वतःचे पाय रोवले. वेगवेगळ्या आशयाची, विषयाची तसेच वेगवेगळ्या लेखकांची नाटकं रंगभूमीवर आणली आणि ती यशस्वी रित्या गाजवली देखील,अनेक नाटकांना पुरस्कार देखील प्राप्त झाले .
गेली १७ वर्ष रंगभूमीची अविरत सेवा करत असतांना नाटक म्हणजे फक्त मनोरंजन नसून मनोरंजनातून प्रबोधन होऊ शकते यावर ठाम विश्वास दाखवत “शिवाजी अंडर ग्राउंड इन भीम नगर मोहोल्ला”, “ठष्ट”, “बॉम्बे 17”, “स्टॅच्यू ऑफ लिबर्टी” यांसारखी सामाजिक भान निर्माण करणारी व्यावसायिक नाटके त्यांनी रंगभूमीवर घेऊन येण्याचे धाडस करत एक ‘प्रयोगशील निर्माता’ म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
सध्या रंगभूमीवर त्यांचे विश्वविक्रमी बालनाट्य अलबत्या गलबत्या धुमाकूळ घालत आहे आणि नुकते रंगभूमीवर दाखल झालेले ‘करून गेलो गाव’ नाटक देखील रसिकांच्या मनात घर करत आहे .
कलाउपासक प्रा. विजय जामसंडेकर सर हे निर्माता राहुल भंडारे यांचे गुरु आणि आपल्या गुरुच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा पहिला पुरस्कार आपल्याला मिळाल्याने राहुल भंडारे भारावून गेले आणि मला मिळालेल्या अनेक पुरस्करां पैकी हा पुरस्कार माझ्या साठी खूप विशेष आहे, मला शब्दात वर्णन करणे पण अवघड आहे अशा भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या .