विक्रम गोखले अभिनीत ‘सूर लागू दे’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित…
काही कलाकार आपल्या उपस्थितीनं वातावरणात नवचैतन्य निर्माण करतात, पण काही अनुपस्थितीतही आपली उणीव भासू देत नाहीत. ते गेले तरी त्यांचं काम कायम बोलत रहातं. असाच काहीसा अनुभव सध्या मनोरंजन विश्व घेत आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मनाला चटका लावणारी एक्झीट घेतली आणि संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. विक्रम गोखले यांनी जरी इहलोकीची यात्रा संपवली असली तरी चित्रपटरूपात ते कायम रसिकांसोबत राहणार आहेत. याच शोकाकूल वातावरणात सिनेरसिकांना दिलासा देणारी बातमी म्हणजे त्यांनी अभिनय केलेला ‘सूर लागू दे’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर ‘सूर लागू दे’च्या पोस्टरला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
निर्माते अभिषेक ‘किंग’ कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली ‘सूर लागू दे’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रवीण विजया एकनाथ बिरजे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी या चित्रपटाच्या वितरणाचं काम पाहत आहेत. ‘सूर लागू दे’ या चित्रपटाच्या शीर्षकातच संगीताचा ताल दडलेला आहे. त्यानुसार या चित्रपटाचं कथानकही काहीशा वेगळ्या पठडीतील आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळये हे दोन दिग्गज कलाकार ‘सूर लागू दे’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या निमित्तानं विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्ये बऱ्याच दिवसांनी एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात सुप्रसिद्ध मराठी टीव्ही अभिनेत्री रीना अगरवालही महत्त्वपूर्ण भूमिकेत असून इतरही मातब्बर कलावंतांची फळी यात असल्यानं अभिनयाची जणू जुगलबंदीच रंगलेली पहायला मिळणार आहे. विक्रम गोखले यांनी नेहमी संवेदनशील, सामाजिक आशयावर आधारलेले, वर्तमान काळाशी निगडित असलेलल्या आणि नाविन्यपूर्ण विषयावर आधारलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘सूर लागू दे’ हा चित्रपट त्यांची परंपरा पुढे सुरू ठेवणारा असून त्यांच्या पश्चातही त्यांचं काम आणखी प्राभावीपणे सादर करणारा ठरेल. या चित्रपटाची कथा अशा लोकांवर आधारलेली आहे ज्यांच्यासाठी विक्रम गोखले कायम उभे राहिले.
सामाजिक जाणीवेचं भान राखून लिहिलेलं प्रेरणादायी कथानक या चित्रपटाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनाचा वारसा जपत ‘सूर लागू दे’ फुल टू मनोरंजन करणार आहे. यात नात्यांची गोष्टही आहे. याबाबत दिग्दर्शक प्रवीण म्हणाले की, ‘सूर लागू दे’ या चित्रपटाची कथा कुठेही घडू शकणारी आहे. आयुष्याच्या संध्याकाळी एक व्यक्ती कशाप्रकारे संघर्ष करत इतरांसाठी प्रेरणादायी कार्य करतो ते यात पहायला मिळेल. यात मुख्य भूमिका साकारणाऱ्या विक्रम गोखले यांच्या पश्चात ‘सूर लागू दे’ हा चित्रपट प्रदर्शित करताना संपूर्ण टिमला खूप दु:ख होत आहे. त्यांच्या जाण्यानं मनोरंजन विश्वाचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं आहे, पण ‘सूर लागू दे’ या चित्रपटाच्या रूपात जाता-जाता त्यांनी आपल्या चाहत्यांना एक अनमोल मेसेज दिला आहे. त्यामुळे त्यांना समर्पित भावनेनं आम्ही हा चित्रपट रसिकांसमोर आणत आहोत. रसिक त्याला उत्तम दाद देऊन आपल्या लाडक्या कलाकाराला अभिवादन करतील यात शंका नाही. ‘सूर लागू दे’ या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केलं असून, संगीत पंकज पडघन यांनी दिलं आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.