*कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मार्केट विभागात चार मराठी चित्रपटांचे प्रदर्शन होणार*
*शासनामार्फत शिष्टमंडळ रवाना.*
*मुंबई १४:* सिने जगतातील प्रतिष्ठेच्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मार्केट विभागासाठी महाराष्ट्र शासनाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्फत निवडण्यात आलेल्या चार मराठी चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये राज मोरे दिग्दर्शित खालीद का शिवाजी, जयंत सोमळकर दिग्दर्शित स्थळ, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित स्नो फ्लॉवर, महेश मांजरेकर दिग्दर्शित जुनं फर्निचर या चित्रपटांचा समावेश आहे.
या महोत्सवाकरिता शासनाच्या अधिकाऱ्यासह चित्रपटांच्या प्रतिनिधीचा चमू कानला रवाना झाला आहे.
दिनांक १५ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता पॅलेस सी याठिकाणी स्नो फ्लॉवर या चित्रपटाचे प्रदर्शन होईल तर दुपारी दीड वाजता पॅलेस बी येथे खालीद का शिवाजी, १८ मे २०२५ रोजी सकाळी ९.१५ वाजता पॅलेस जी येथे जुन फर्निचर आणि दुपारी १.३० वाजता पॅलेस एफ येथे स्थळ या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे.
मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि निर्मात्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता महाराष्ट्र शासन मागील अनेक वर्षांपासून विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळत असल्याची भावना चित्रपटांच्या निर्माते दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे.