‘विजयी भव’मध्ये मुख्य भूमिकेत ‘इंडियन आयडल’ फेम जगदीश चौहान
खेळ आणि राजकारण यांची अचूक सांगड घालणारा ‘विजयी भव’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकारणाच्या पटलावर रंगलेला कबड्डीचा डाव ‘विजयी भव’ या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. त्यामुळं केवळ खेळ एके खेळ असं चित्र यात दिसणार नसून, राजकारणातील डावपेचही ‘विजयी भव’मध्ये असणार यात शंका नाही. आपल्या बहारदार गायकीनं इंडियन आयडल मराठीचा मंच गाजवणारा जगदीश चौहान या चित्रपटाचं मुख्य आकर्षण ठरणार आहे.
स्वास्तिक मोशन पिक्चर्स प्रोडक्शनची निर्मिती आणि केनिल एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या ‘विजयी भव’ या आगामी मराठी चित्रपटाची निर्मिती किर्तन गोर्धनभाई पटेल आणि जगदीश एम. पवार यांनी केली आहे. शैलेश पटेल आणि अतुल सोनार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘विजयी भव’चं मुख्य आकर्षण म्हणजे गायक-अभिनेता जगदीश चौहान यात मुख्य भूमिकेत झळकणार असून पूजा जैसवालसोबत त्याची जोडी जमणार आहे. गायनात तरबेज असणारा जगदीश इंडियन आयडल मराठीच्या पहिल्या पर्वाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचला आहे. खऱ्या अर्थानं जगदीशच्या गायनशैलीचा कस लावणाऱ्या या शोमध्ये तो उपविजेता ठरला होता. सर्वत्र कौतुक झालेल्या जगदीशनं आता अभिनय क्षेत्रात विजयी होण्यासाठी ‘विजयी भव’ हा मंत्र जपत मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. जगदीशनं यापूर्वी ‘झाला महार पंढरीनाथ’ या नाटकात तीन व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ‘जिद्दी’ या मराठी सिनेमासाठी गायन केलं आहे. जगदीश आणि पूजासोबत या चित्रपटात सोनाली दळवी, विनायक केतकर, जगदीश पवार, विक्रम मेहता आदी कलाकारांनी अभिनय केला आहे.
या चित्रपटाची कथा जगदीश पवार यांनी लिहिली असून, पटकथा अतुल सोनार यांची आहे. मुकुंद महाले यांनी अतुल सोनार यांच्या साथीनं संवादलेखन केलं आहे. गीतकार विरेंद्र रत्ने यांनी लिहिलेली आणि जगदीश चौहान, कविता राम, मंजिमा गोस्वामी, वैशाली माडे, नूरा सिंग आडे, स्वप्नाली चौहान यांनी गायलेली गीतं संगीतकार कबीर शाक्या यांनी संगीतबद्ध केली आहेत. पार्श्वसंगीत स्वप्नील नंगी यांचे असृन डिओपी लालजी बेलदार यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. विक्रांत देव, नॅाडी रसाळ, राम देवन, दीपक तुरी यांनी कोरिओग्राफी केली असून, संकलन धर्मेश चांचडीया यांनी केलं आहे. परवेझ आणि शहाबुद्दीन हे या सिनेमाचे फाईट मास्टर्स असून, संपत आणि अश्विन कार्यकारी निर्माते आहेत. कश्मीरानं कॅास्च्युम डिझाईन केलं असून, हमजा दागीनावाला यांनी साऊंड डिझाईंनींगचं काम पाहिलं आहे. किशोर संगानी आणि सुरेश पाटील या चित्रपटाचे प्रोडक्शन मॅनेजर्स आहेत.