प्रेमात पडल्यावर ‘बांबू’ लागतो म्हणजे नेमके काय!
विशाल सखाराम देवरुखकर ‘बांबू’ घेऊन सज्ज झलेले असून प्रेमात पडलेल्या, नव्हे लागलेल्या प्रत्येकासाठी हा सिनेमा आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला असून यानिमित्ताने ‘बांबू’चे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटाची पहिलीच झलक खूप काही सांगून जाणारी आहे. ‘लव्ह अंडर कन्स्ट्रक्शन’ म्हणजेच यात प्रेमकहाणी पाहायला मिळणार असून त्यात ‘बांबू’ही पडणार आहेत. आता हे ‘बांबू’ कोणाला आणि कसे पडणार आहेत, हे पाहाणे रंजक ठरेल.
दिग्दर्शक विशाल देवरुखकर चित्रपटाबद्दल म्हणतात, ” हा एक युथ एंटरटेनिंग चित्रपट असून यात खुमासदार कथानक पाहायला मिळणार आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाने हा चित्रपट आपल्या साथीदारासोबत पाहावा. कुठेतरी हा चित्रपट तरुणाईला आपल्या आयुष्याशी नक्कीच मिळताजुळता वाटेल. खूप हलकाफुलका विषय असून प्रेमात पडलेल्या सर्वांनाच हा धमाल सिनेमा आवडेल.
निर्माती तेजस्विनी पंडित आपल्या पदार्पणाबद्दल म्हणते, विशाल देवरूखकर यांचे चित्रपट नेहमीच तरुणाईला भुरळ पाडणारे असतात. हल्लीच्या मुलांची भाषा, वागणे, जीवनशैली अशा युवा भावविश्वाभोवती फिरणारे त्यांचे चित्रपट तरूणतरुणींना स्वतःच्या आयुष्यासारखे वाटतात. विशेष म्हणजे या चित्रपटातून काहीतरी बोधही दिला जातो. मला आणि संतोषला ही कथा खूप भावली त्यामुळेच निर्मिती पदार्पणासाठी आम्ही ‘बांबू’ची निवड केली.”