दिग्दर्शक संतोष पवार ‘सुंदरा मनात भरली’ हे नाटक घेऊन आले आहेत, याबद्दल ‘मुंबई न्यूज’ शी बोलताना संतोष म्हणाले, “मी कधीच माझ्या नाटकांमध्ये मोठा कलाकार घेतला नाही; कारण माझी पहिल्यापासून एकच इच्छा आहे प्रेक्षकांनी माझे नाटक बघावयास यायला हवे ना की स्टार. शेवटी कसे आहे, नवीन कलाकाराची कला प्रेक्षकांना आवडली तर प्रेक्षकच पुढे त्यांना सेलिब्रिटी करतात. म्हणून मी आतापर्यंत जी नाटके केली त्यात नवीनच कलाकार घेतले नवीन कलाकाराला काहीतरी करून दाखवण्याची ऊर्मी असते, गर्मी असते आणि तो नवीन असल्यामुळे त्यांना ती संधी ही असते आणि एक दिग्दर्शक म्हणून त्यांच्यातील कला बाहेर काढणे हे मला चॅलेंजिंग वाटतं आणि ते मी एन्जॉय सुद्धा करतो.
मला असे वाटते प्रेक्षकांनी नाटक बघावयास आल्यानंतर त्या नाटकांमध्ये गुंतून जावे ना की त्या सेलिब्रिटी मध्ये आणि हे सर्व तुम्हाला ‘सुंदरा मनात भरली’ मध्ये पहावयास मिळेल ‘सुंदरा मनात भरली’ ही शाहीर राम जोशी यांनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेली लावणी आहे. आपल्याकडे लोकनाट्याला लावण्यांना खूप नाक मुरडली गेली पण ती कला अजूनही जिवंत आहे, का तर ती कला दर्जेदार आहे आणि म्हणूनच आज पर्यंत रंगभूमीवर इतिहास केलेली हजारोंनी नाटकं ही लोकनाट्य आहेत कारण त्यातील जी ऊर्जा आहे, जो स्पीड आहे, जी लवचिकता आहे ती प्रेक्षकांना प्रचंड भावते. ‘सुंदरा मनात भरली’ हे लोकनाट्य नाहीये हे लोकनाट्याची पार्श्वभूमी असलेले नाटक आहे. शेकडो वर्षापूर्वी ‘गुल बकावलीचा वग’ म्हणून एक प्रहसन आलं होतं, त्यावरून हे नाटक मी केले आहे. नाटकाचा जो काळ आहे तो ब्रिटिश राजवटीतला आहे, मात्र तरीही यात करंट अफेयर्स सुद्धा तुम्हाला मिळतील ही तारेवरची कसरत मी बरोबर साधली आहे. त्यामुळे सुजाण प्रेक्षकाला ते लगेच कळेल. व ही भन्नाट कल्पना त्याला आवडेल याची मला खात्री आहे.
यातील वेशभूषा ही मंगला केंकरे यांनी केली असून त्याला संगीत अशोक पत्की यांनी दिले आहे. गायक म्हणून नंदेश उमप असून, कलाकार संतोष पवार, विकास समुद्रे, स्मृती बडदे तर निर्माते विनोद नाखवा आहेत.