मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे गेल्यावर व्हिक्टोरिया घोडागाडीत न बसलेला पर्यटक शोधुनही सापडणार नाही मात्र घोडा गाडीला बंदी आल्यानंतर या व्हिक्टोरिया गाड्या मरीन ड्राईव्ह वरून गायब झाल्या होत्या मात्र आता तीच पूर्वीची मजा आपणा सर्वांना अनुभवास मिळणार आहे मात्र या गाडीला घोडे नसून बॅटरी असेल.
आज ( १५ ) रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या इलेक्ट्रिक बग्गीचे अनावरण करण्यात आले. या बग्गीचे भाडे साधारणतः १०० रुपया पासून ५०० रुपयांपर्यंत असेल ( किलोमीटर व वेळेवर आधारित ) असे समजते. मुंबईतील हेरिटेज स्थळे दाखवणे आणि प्रत्येक स्थळाजवळ संबंधित स्थळांची माहिती पर्यटकांना मिळण्याची सुविधा या गाडीत असेल. या बग्गीचा वेग २० किलोमीटर प्रति तास असेल. ही बग्गी पर्यावरणपूरक लिथियम बॅटरीवर चालणारी असून एकदा बॅटरी चार्ज झाल्यावर ७० ते ८० किमीपर्यंत प्रवास शक्य होणार आहे. मुंबई नंतर संजय गांधी नॅशनल पार्क, जुहू, बँडस्टँड, ठाणे तलाव पाळी इत्यादी ठिकाणी या सेवेचा विस्तार तर मुंबईबाहेरील पर्यटनस्थळांवरही लवकरच सेवा सुरु केली जाणार असून मुंबईतील मोठ्या रेस्टॉरंटसोबतही करार केला जाणार आहे.
उबो राईड्ज या कंपनीकडून बग्गी चालविण्यात येणार आहे. एकूण ४० व्हिक्टोरिया बग्गी टप्प्याटप्प्याने मुंबईत चालवण्यात येतील. पहिल्या टप्प्यात १२ दक्षिण मुंबईत सुरु करण्यात येणार आहेत. या १२ बग्गींपैकी ६ बग्गी ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील ताज पॅलेस हॉटेल समोरून सुटतील. तर उरलेल्या ६ बग्गी नरिमन पॉइंट येथून सुटणार आहेत. या बग्गींमधून सायंकाळी ४ वाजल्यापासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईची सफर करता येईल. घोडागाड्या बंद झाल्याने या व्यवसायातील सुमारे २५० बेरोजगारांना यात सामावून घेतले जाणार आहे.
चला तर मग मरीन ड्राईव्हवर जाऊया व या व्हिक्टोरियाच्या सफारीचा आनंद पुन्हा घेऊयात