पूर्वी अर्थात रिंकू राजगुरू आणि नील अर्थात चिन्मय उदगीरकरचा साखरपुडा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अनेक मान्यवरांसह मीडियाही उपस्थित होती. थोडे अचंबित झालात ना? कारणच तसे आहे. खरं तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्नाच्या आधी येणारा हा खास क्षण. हा क्षण अधिकच अविस्मरणीय करण्यासाठी गणेश पंडित लिखित, दिग्दर्शित ‘मेकअप’ चित्रपटातील ‘गाठी गं’ हे गाणेही नुकतेच पूर्वी आणि नीलच्या साखरपुड्याच्या निमित्ताने धुमधडाक्यात लाँच करण्यात आले.
साखरपुड्यावर आधारित असलेले हे गाणे उत्साहाने भरलेले आहे. यात नीलला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत आहे तर अनेक स्वप्ने उराशी बाळगून नव्या आयुष्याची सुरुवात होत असतानाच काळजात सुरु असलेली धाकधूक पूर्वीच्या चेहऱ्यावर दिसत आहे. या नाजूक क्षणातून जातानाच तिच्या चेहऱ्यावर लालीही पसरलेली आहे. नील -पूर्वीच्या साखरपुड्याचा आनंद सगळ्यांच्याच चेहऱ्यावर ओसंडून वाहत असल्याचा दिसतोय. नकळत आपल्या स्वतःच्या आयुष्याशी जोडता येणारे हे गाणे शाल्मली खोलगडे हिने गायले असून या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे. तर गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे आहेत. या गाण्याला विठ्ठल पाटील यांचे नृत्य दिग्दर्शन लाभले आहे.
या गाण्याबद्दल लेखक, दिग्दर्शक गणेश पंडित सांगतात, ” हे गाणे खूपच ऊर्जा देणारे असून शाल्मलीने हे गाणे पहिल्याच प्रयत्नात गायले. या गाण्याभोवतीच या चित्रपटाची कथा फिरते आणि तिथूनच चित्रपट खरा सुरु होतो. या गाण्यात रिंकूच्या ‘मेकअप’चे रूप पाहायला मिळते. या गाण्यात कोरिओग्राफर विठ्ठल पाटील यांनी सगळ्यांनाच ठेका धरायला लावला आहे. हे गाणे इतके धमाकेदार आहे, की तुमचेही पाय नकळत थिरकतील.”
सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्याव्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.