सचिन चिटणीस ⭐⭐⭐
ज्ञान आणि विज्ञाना वर आधारित ” लाईफलाईन ”
डॉक्टरांचे आधुनिक विचार आणि किरवंतामध्ये खोलवर रुजलेली परंपरेची मुळे या दोघांमधील वैचारिक तफावत दाखवणारा दिग्दर्शक साहिल शिरवईकर यांचा ‘लाईफलाईन’ हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करावा लागणार असा आहे.
लाईफलाईन मध्ये डॉक्टर आणि किरवंतामधील संघर्ष दाखवण्यात आला आहे. ज्ञान आणि विज्ञान एकत्र आले तर कित्येक गरजूंचे प्राण वाचू शकतील, या मताचे डॉक्टर आहेत. तर, माणसाच्या आयुष्यात दोनच जण महत्वाचे असतात, एक भगवंत जो जन्म देऊन खाली पाठवतो आणि दुसरा किरवंत जो निरोप देऊन वर पाठवतो, या विचारसरणीचे किरवंत आहेत. या दोघांच्या संघर्षात अनेक टप्पे येतात. डॉक्टर की किरवंत, कोणाचा विजय होईल, कोणाची बाजू योग्य ठरेल हे चित्रपटात दिसणार आहे.
आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरेमध्ये अडकलेला हा वाद आहे. आता या वादाचा शेवट कसा होतो, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. ‘लाईफलाईन’च्या निमित्ताने सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला गेला असून हा प्रयत्न प्रेक्षकांना आवडेल असाच आहे.
‘लाईफलाईन’ चित्रपटाचे दिग्दर्शन साहिल शिरवईकर यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहेत. तर अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी स्वर दिला आहे.
माधव अभ्यंकर यांनी किरवंत मोठ्या तडफेने रंगवला आहे. डोळ्यांच्या माध्यमातून केलेला अभिनय अतिसुंदर. अशोक सराफ यांनी नेहमीच्या विनोदी शैलीच्या उलट धीर गंभीर डॉक्टर जोशात रंगवला आहे.
अवयव दानाचे महत्त्व पटवून सांगणारा सदर चित्रपट नक्की बघावा असा आहे.