गुरुवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना होणार प्रदान

*गुरुवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना होणार प्रदान*

*गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम आणि राजकपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कारांचेही होणार वितरण*

*५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार वितरण*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती*

महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार,  येत्या गुरूवारी दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते  अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

तर मानाचा “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.

वरळी येथील डोम, एनएससीआय ( नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात करण्यात येतील. या समारंभास केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नुकताच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. राजकपूर जीवनगौरव पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुण इराणी, सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना जाहीर झाला आहे तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक जे. पी. दत्ता, सन २०२१ साठी ख्यातनाम गायक सोनू निगम आणि सन २०२२ साठी विधू विनोद चोप्रा यांना जाहीर झाला आहे. या समारंभात त्यांना सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जातील.

ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार सन २०२० साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते स्व. रविंद्र महाजनी (मरणोत्तर), सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा चव्हाण आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा नाईक यांना जाहीर झाला आहे. यासोबतच चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, सन २०२१ साठी ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठे  आणि सन २०२२ साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे. या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

*चित्रपट सृष्टी साठी कार्यरत सांस्कृतिक कार्य मंत्री*

राज्य शासनाने नेहमीच मराठी चित्रपट आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित कलावंत, तंत्रज्ञ यांच्या अडचणी सोडविण्याची आणि त्यांच्या मागे ठामपणे उभे राहून या क्षेत्राला मदतीची भूमिका घेतली आहे. चित्रपटांसाठीचे रखडलेले अनुदान हा महत्वाचा विषय तातडीने मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मार्गी लावला. चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या विविध परवानगी वेळेत मिळण्यासाठी एक खिडकी पद्धत सुरु करण्याचा निर्णय घेतला. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याशी वेळोवेळी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याशिवाय, या क्षेत्रातील विविध कला घटकांसाठी देण्यात येणारे पुरस्कार वेळेत देण्यासंदर्भातील वेळापत्रक तयार केले आहे. त्या अनुशंगाने गेल्या दोन वर्षातील पुरस्कारही यावर्षी देण्यात येणार असून यापुढील काळात प्रत्येक पुरस्कार हा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या दिनांकाला प्रदान करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी ठरवले आहे.

* सुधीर मुनगंटीवार यांनी या सर्व पुरस्कारांच्या रकमाही दुप्पट केल्या आहेत.* तसेच गोरेगाव आणि कोल्हापूर येथील चित्रनगरीच्या विकासातील सर्व अडथळेही दूर केले असून या दोन्ही ठिकाणी आता चित्रपट निर्मात्यांना चित्रिकरणासाठीच्या आवश्यक सोयी सुविधा एकाच ठिकाणी व सहजतेने एक खिडकी योजनेतून उपलब्ध होणार आहेत. तसेच राज्यभर कोठेही शासकीय व सार्वजनिक जागा चित्रिकरणाकरता आता निःशुल्क उपलब्ध करून देण्याचाही निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns