जिद्द आणि चिकाटीने ग्रामीण भागातील धावपटू ने घातली यशाला गवसणी
मिलिंद बेर्डे / लांजा
तालुक्यातील वेरवली बुद्रुक गावचा सूपुत्र असलेल्या २५ वर्षिय धावपटुने अतिशय कठिण समजल्या जाणार्या विविध मॅरेथॉन स्पर्धा मध्ये अव्वल नंबर पटकावुन लांजा तालुका व वेरवली बुद्रुक गावचे नाव नव्या शिखरावर नेले आहे. संसाधनांचा अभाव, घरची आर्थिक परिस्थिती बेताची यातुन खचुन न जाता काबाडकष्ट करुन फावल्या वेळात प्रॅक्टिस करुन त्याने मिळविलेले हे यश व्दिगणित असे आहे. तालुक्यात सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे.
निलेश नंदकिशोर कुळये वेरवली बुद्रुक गावचा २५ वर्षाचा एम. ए पर्यत शिक्षण घेतलेला धावपटु. त्याला लहानपणापासुनच धावण्याची आवड होती. ही आवड जोपासण्यासाठी पहिल्यांदा २०२१ मध्ये त्याने एस. के. एफ. गोवा मॅरेथॉन (४२ किमी.) या स्पर्धेत भाग घेतला आणी पहिल्याच प्रयत्नात त्याने या स्पर्धेत व्दितिय क्रमांक पटकावुन आपले धावण्याचे कौशल्य सिद्ध केले. त्यानंतर २०२२ मध्ये परत एकदा याच एस. के. एफ गोवा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला असता तृतीय क्रमांक पटकावला तर याच वर्षी झालेल्या आपला पुणे मॅरेथॉन (४२ किमी) स्पर्धेत तृतिय क्रमांक तर मावळ घाटी अल्ट्रा माऊंटेन रन (५० किमी) स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. २०२३ मध्ये सलग तिसर्यादा एस. के. एफ. गोवा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला असता यावेळी थेट प्रथम क्रमांकालाच गवसणी घातली. तर सलग दुसर्यांदा मावळ घाटी अल्ट्रा माऊंटेन रन (७५ किमी) स्पर्धेत सहभाग नोंदविला असता व्दितिय क्रमांक पटकाविला आहे. तर पुणे अल्ट्रा मॅरेथॉन (५० किमी) व के. टु. एस. सिंहगड रन (१८ किमी) या दोन्ही मॅरेथॉन स्पर्धा मध्ये प्रत्येकी प्रथम क्रमांक पटकावुन निलेशने मॅरेथॉन स्पर्धा मध्ये आपली वेगळी ख्याती निर्माण केली आहे.
निलेशचे हे मॅरेथॉन स्पर्धामधील यश डोळे दिपावणारे असले तरी धावण्यासाठी लागणारा संतुलित आहार, धावण्यासाठी आवश्यक असे महागडे स्पोर्ट शुज व विविध मॅरेथॉन स्पर्धेत सहभागासाठी भरावी लागणारी प्रवेश फी यासाठी लागणारे पैसे घरची परिस्थिती बेताची असल्याने सतत निलेश ला आर्थिक चणचण भासत होती. तरी न डगमगता मोठ्या जिद्दीने निलेश भेटेल ते काम करुन येणारे स्पर्धा मध्ये सहभागासाठी येणारे खर्च स्वताच भागवत आला आहे. त्यामुळेच निलेशचे हे यश व्दिगणित विशेष अधोरेखित करावे लागेल.