मुबई गोवा महामार्गावर खड्डेच खड्डे

मुबई गोवा महामार्गावर खड्डेच खड्डे

लांजा (प्रतिनिधी) सद्यस्थितीत मुंबई-गोवा महामार्गाची अतिशय दुरवस्था झाली आहे .शहर परिसरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे हे खड्डे तात्काळ बुजवून महामार्ग वाहतुक योग्य करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे शहरातील महामार्गाची अतिशय दुरवस्था झालेली होती. त्यामुळे मे महिन्यात समस्त लांजा वासियांच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसाठी जन आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी ठेकेदार कंपनी, महामार्ग विभाग अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ठेकेदार कंपनीने रस्त्याच्या दुतर्फा चांगल्या दर्जाचा रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शहरात रस्ते झाले होते. मात्र पहिल्याच पावसात या महामार्गाची आणि रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत असून पावसामुळे खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहने आपटत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लांजा तालुका पदाधिकारी यांनी महामार्ग ठेकेदार कंपनी हॅन इन्फ्राचे प्रोजेक्ट मॅनेजर यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले. सध्या पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले असून त्यातून वाट काढताना वाहनचालकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हे खड्डे तात्काळ बुजवावेत आणि वाहतूक योग्य रस्ता करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लांजा तालुका अध्यक्ष मनोज देवरुखकर, उपतालुका अध्यक्ष राकेश राऊत, शहराध्यक्ष दिलीप लांजेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns