पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर.
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान, पुणे, हा एक नोंदणीकृत सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट असून मंगेशकर कुटुंबीयांनी ३२ वर्षांपूर्वी स्थापन केला आहे. प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार २४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईतील श्री षण्मुखानंद हॉल, येथे आयोजित करण्यात आला आहे. दीनानाथ मंगेशकर यांचा २४ एप्रिल हा स्मृतीदिन असून त्यानिमित्ताने या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी भारतरत्न लता दीदींच्या निधनाने आमच्या कुटुंबावर सर्वात मोठा दुःखद प्रसंग कोसळला. कुटुंब आणि ट्रस्ट ( कुटुंबातील सर्व सदस्य प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत ). प्रतिष्ठानने भारतरत्न लता दीदींच्या स्मरणार्थ आणि स्मृतीप्रित्यर्थ यावर्षीपासून पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. हा पुरस्कार “लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार” म्हणून ओळखला जाईल, आणि दरवर्षी दीनानाथजींच्या स्मृतीदिनी म्हणजे २४ एप्रिल रोजी प्रदान केला जाणार आहे.
यंदा मास्टर दीनानाथजींचा ८० वा स्मृती दिन आहे. त्यानिमित्त आम्ही “लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार” ची घोषणा करीत आहोत. हा पुरस्कार दरवर्षी देशासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान देणाऱ्या फक्त एकाच व्यक्तीला दिला जाईल. हा पहिला पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. ते आमचे सर्वात आदरणीय नेते आहेत; भारताला जागतिक नेतृत्वाच्या वाटेवर नेणारे ते एक आंतरराष्ट्रीय राजकारणी आहेत. त्यांच्या नेतृत्वात देशाने प्रत्येक बाबतीत नेत्रदीपक प्रगती केली आहे, हजारो वर्षांच्या गौरवशाली इतिहासात आपल्या महान राष्ट्राने पाहिलेल्या महान नेत्यांपैकी ते खरोखरच एक आहेत आणि हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल आमचे कुटुंब आणि ट्रस्ट त्यांचे आभार मानते असे हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी सांगितले.
उषा मंगेशकर या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.
पुरस्कार प्राप्त नामवंतांची यादी खालीलप्रमाणे आहे.
१. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- माननीय नरेंद्र मोदी (विशेष वैयक्तिक पुरस्कार)
२. मास्टर दीनानाथ पुरस्कार- राहुल देशपांडे (भारतीय संगीत)
३. मास्टर दीनानाथ पुरस्कार- (विशेष पुरस्कार) आशा पारेख (चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा)
४. मास्टर दीनानाथ पुरस्कार- (विषेश पुरस्कार) जॅकी श्रॉफ (चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा)
५. मास्टर दीनानाथ पुरस्कार- (आनंदमयी पुरस्कार) मुंबईचे डबेवाले (नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट) समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवा.
६.सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार- संज्या छाया
मास्टर दीनानाथजी यांचे गायक, संगीतकार आणि रंगमंच कलाकार म्हणून महाराष्ट्र आणि भारतातील लोकांसाठी अतुलनीय आणि प्रेरणादायी योगदान आहे, त्यांच्या स्मरणार्थ, मंगेशकर कुटुंब दिग्गजांना सन्मानित करण्यासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कारांचे आयोजन करते. आम्हाला जनतेचे प्रेम आणि पाठिंबा मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे.” असे हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी म्हटले.
यंदाचा पुरस्कार सोहळा संध्याकाळी ६ ते ६.१५ दरम्यान सुरु होईल. ७.४५ ते ८.०० मध्यंतर असेल. रात्री ८ वाजता “स्वरलतांजली” या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल आहे. सुप्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड यांच्याद्वारे हा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. या कार्यक्रमात आपल्या लाडक्या माननीय लता दीदींच्या अमर सुरांना आणि आठवणींना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. रूप कुमार राठोड, हरिहरन, आर्या आंबेकर, रीवा राठोड, प्रियांका बर्वे, मधुरा दातार आणि विभावरी आपटे या आपल्या मधुर संगीतांनी लतादीदींची गाणी सादर करणार आहेत. हा संगीत कार्यक्रम हृदयेश आर्ट्स, ८० वी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथी आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.