संजय जाधव हे नाव मराठी चित्रपटसृष्टीला दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर म्हणून सुपरिचित आहे. अनेक उत्तमोत्तम चित्रपटांच्या छायांकनाची जबाबदारी निभावल्यानंतर संजय जाधव आता पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटाचे छायांकन करण्यासाठी सज्ज आहेत. अनुप जगदाळे दिग्दर्शित “रावरंभा” या चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी संजय जाधव निभावत असून, कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला.
“रावरंभा” या चित्रपटाची निर्मिती शशिकांत शीला भाऊसाहेब पवार करत आहेत. बेभान, झाला बोभाटा, भिरकीट असे उत्तम चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी “रावरंभा”चं लेखन केलं आहे. इतिहासाच्या पानांमध्ये “रावरंभा” ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे.ही प्रेमकहाणीच “रावरंभा” या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत आहे. या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात चित्रित होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे.
संजय जाधव हे प्रयोगशील सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यामुळे आता “रावरंभा” चित्रपटाचे छायांकन करतानाही ते त्यांच्यातील प्रयोगशीलतेचा प्रत्यय प्रेक्षकांना नक्कीच देतील. संजय जाधव यांच्यासारख्या समर्थ सिनेमॅटोग्राफरच्या दृष्टिकोनातून चित्रीत होणारी “रावरंभा” ही ऐतिहासिक प्रेमकहाणी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल यात शंका नाही.