प्रसाद कांबळी आतातरी…….

१३ जानेवारी २०२१ रोजी संपन्न झालेल्या नियामक मंडळाच्या सभेत नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना बहुमत नसल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी नियामक मंडळाच्या सदस्यांनी केली होती. परंतु कांबळी यांनी राजीनामा न दिल्यामुळे नियामक मंडळाने सभा घेऊन त्यात नरेश गडेकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली.

नाट्य परिषदेच्या प्रचलित घटनेप्रमाणे नाट्य परिषदेची स्थावर व जंगम मालमत्तेची तसेच राखीव निधीचा विनियोग करणे ही जबाबदारी विश्वस्त मंडळाची आहे. हे ज्ञात असूनही, मनमानीपणे कारभार करता येणार नाही म्हणून विश्वस्त मंडळातील रिक्त जागा भरणे संदर्भात कोणतीही कार्यवाही विश्वस्त मंडळाचे निमंत्रक शरद पोंक्षे करित नाहीत. याबाबतीत तहहयात विश्वस्तांनी गांभिर्याने लक्ष घालून या अनागोंदी व मनमानी कारभारास अटकाव घालावा अशी विनंती नियामक मंडळ सदस्यांनी केली. ­­­परिषदेच्या घटनेत विश्वस्त कलम १७ (४) नुसार “कार्यकारी समिती अगर नियामक मंडळातील कामकाजाबद्दल कोणत्याही स्वरूपाचे तीव्र मतभेद निर्माण झाल्यास विश्वस्त मंडळ नि:पक्षपातीपणे निर्णय घेतील. सदरील निर्णय कार्यकारी समिती व नियामक मंडळ यांना बंधनकारक असेल.’ असे स्पष्ट नमूद आहे. त्यानुसार विश्वस्तांनी तातडीने यात हस्तक्षेप करून बहुसंख्य नियामक मंडळ सदस्यांना न्याय द्यावा अशी ही विनंती केली. यावर तहहयात विश्वस्तांनी विश्वस्त मंडळ परिपूर्ण करावे असे सांगितले. परिषदेच्या घटनेप्रमाणे विश्वस्त मंडळात एकुण ७ + २ (पदसिध्द) अशी एकूण ९ विश्वस्तांची संख्या आहे. परंतू सध्या विश्वस्त मंडळात सात पैकी केवळ तीन पदे भरलेली आहेत व चार पदे रिक्त आहेत. विश्वस्त मंडळाचे काम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी रिक्त जागा घटनेच्या तरतुदीनुसार त्वरित भरणे आवश्यक आहे. यासाठी कार्यकारी समिती व नियामक मंडळाच्या सभेचे आयोजन करावे अशी सुचना तहहयात विश्वस्तांनी नाट्य परिषदेचे अध्यक्ष नरेश गडेकर यांना दिल्या आहेत. त्यानुसार पुढील १५ दिवसात कार्यकारी मंडळ आणि नियामक मंडळ यांच्या त्वरित सभा घेवून यावर कार्यवाही होईल असे अध्यक्ष नरेश गडेकर यांनी सांगितले.

विश्वस्त मंडळातील रिक्त जागा भरणे संदर्भात निवड केलेल्या सदस्यांची मान्यता ही नाट्य परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्याचे त्यांना बंधनकारक असल्याचा उल्लेख शरद पवार यांनी गडेकरांना पाठविलेल्या पत्रात आहे. असे असले तरी, नाट्य परिषदेचा कार्यभार प्रसाद कांबळी यांनी अजूनपर्यंत त्यांना दिलेला नाही. प्रसाद कांबळी यांनी तो सुपूर्द करावा, असे पत्र सुद्धा काही महिन्यांपूर्वी शरद पवार यांनी नाट्य परिषदेला दिले होते. परंतु त्या पत्राची दखल परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी घेतली नव्हती. २०१७ साली घटना दुरुस्ती झाली असुन विश्वस्त मंडळ परिपूर्ण केले नसल्याने, रिक्त विश्वस्त मंडळातील जागा भरणे कामी पोंक्षे यांनी सहकार्य करावे. नियामक मंडळाच्या व तहहयात विश्वस्तांच्या मतांचा आदर प्रमुख कार्यवाह व विश्वस्त मंडळाचे निमंत्रक शरद पोंक्षे यांनी करून सहकार्य करावे अशी भावना नियामक मंडळ सदस्य व्यक्त करत आहेत. यावर शरद पोंक्षे काय कार्यवाही करतात याचे उत्तर थोड्याच दिवसात नाट्यरसिकांना समजेल अशी आशा करूयात.

 

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns