निर्माते “राहुल भंडारे” यांच्या “अद्वैत थिएटर” ला १५ वर्ष पूर्ण

निर्माते “राहुल भंडारे” यांच्या “अद्वैत थिएटर” या नाट्य संस्थेने ‘जागो मोहन प्यारे, करून गेलो गाव, शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, टॉम अँड जेरी, ठष्ट, एकदा पहावं न करून, सत्य, स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, अलबत्त्या गलबत्त्या, निम्मा शिम्म्मा राक्षस आणि आरण्यक’ यांसारख्या अनेक दर्जेदार नाट्यकलाकृतींची निर्मिती केली. नुकतीच या संस्थेला १५ वर्ष पूर्ण झाली असून, गेल्या १५ वर्षांमध्ये या संस्थेने २० हून अधिक एकामागोमाग एक सरस नाटकं मराठी नाट्य रसिकांना दिली. दर्जेदार निर्मिती आणि वेगळे प्रयोग म्हणून अद्वैत थिएटर चं नाव घेतलं जातं.
“अद्वैत थिएटर” निर्मित नाटकांमध्ये एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवलेले ‘प्रियदर्शन जाधव’ दिग्दर्शित आणि ‘सिद्धार्थ जाधव’ला वेगळी ओळख मिळून देणार “जागो मोहन प्यारे” हे नाटक रसिकप्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे… ‘वैभव मांगले’ आणि ‘भाऊ कदम’ या महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीसोबत ’करून गेलो गाव’ या नाटकाचे संस्थेने जवळपास पावणे पाचशे हून अधिक प्रयोग करून मराठी रसिकांचं मनोरंजन केलं…. त्यानंतर आलेल्या नाटकांमध्ये ’टॉम अँड जेरी’ या नाटकाचा विषय वेगळा आणि हाताळणी उत्तम होती, लग्न होऊनही एकमेकांच्या विचारांमध्ये असलेल्या तफावतीमुळे वेगवेगळं राहणाऱ्या जोडप्याची ही कथा, कादंबरी कदम चा बिनधास्त पणा आणि लाजराबुजरा निखिल रत्नपारखी यांच्या अभिनयातून उत्कृष्ट पणे सादर व्हायचा आणि त्या जोडीला समर्पक अशा संवादामुळे प्रेक्षकांना हे नाटक खिळवून ठेवत असे…. पुढे अद्वैत संस्थेने राजकुमार तांगडे लिखित, नंदू माधव दिग्दर्शित आणि संभाजी भगत यांचे गीतलेखन असलेल्या ’शिवाजी अंडरग्राऊड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचे सुरुवातीचे फक्त ९ महिन्यात १०० प्रयोग केले, शिवाजी महाराजांचा खरा विचार काय होता आणि वेगवेगळ्या समुहानी शिवाजीराजांचा वापर कसा करून घेतला याची मार्मिक उलट तपासणी करणारे हे नाटक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झाले…. त्यानंतर संजय पवार लिखित आणि दिग्दर्शित ‘ठष्ट’( ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलीची गोष्ट) हे नाटक रंगभूमीवर आलं , नाटकाचं नाव चमत्कारिक असल तरी त्याची फोड मात्र त्यातल्या विषयाकडे स्पष्ट निर्देश करणारी आहे… विशेष म्हणजे या नाटकाला शासनाचा सर्वोत्कृष्ट नाटकाचा ५ लाखांचा पुरस्कार देखील प्राप्त झाला…. या नंतर आलेले नवे नाट्य पुष्प योगेश सोमण लिखित आणि रीमा लागू यांची प्रमुख भूमिका असलेले ’एकदा पहावं न करून’, विषय- लिव्ह इन च नातं ! वेगळेपण हे की यामध्ये एक आजी आपल्याला पटवून देते की या नात्या कडे आपण आता नवराबायकोच्याच नात्यासारखं निखळ बघावं तर दुसऱ्या बाजूला त्या नात्यालाही आपली जबाबदारी, कर्तव्य असावीत हे नाटकातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला… यानंतर “स्टॅच्यु ऑफ लिबर्टी हे अरविंद जगताप लिखित आणि दिग्दर्शित नाटक या नाटकातून आजचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला .. हे नाटक बघायला येताना प्रेक्षकांनी आपली जात सोबत आणू नये असा टॅग नाटकाला देण्यात आला होता … नाटक बघितल्यानंतर प्रेक्षक विचाराने नक्कीच मोकळे होत होते, नाटकाचा २५ वा प्रयोग ‘दामोदर नाट्यगृह, परेल’ ला होता आणि पहिल्या अंकानंतर नाट्यगृहतील लाईट बंद पडले, मात्र प्रयोग थांबला नाही प्रेक्षकांनी मोबाईल torch च्या सहाय्याने प्रयोग बघून पूर्ण केला…. त्यानंतर एक उत्तम बालनाट्य कसे असावे हे “अलबत्या गलबत्या” आणि “निम्मा शिम्मा राक्षस”* या बालनाट्य मधून दाखवले…या बालनाट्याचे अनेक वेगवेगळे विक्रम देखील झाले… फक्त लहान मुलेच नाही तर मोठ्यांना सुद्धा बालपणात घेऊन जाण्यात ही नाटके यशस्वी झाली आहेत…. त्यानंतर ४४ वर्षांपूर्वी रंगमंचावर आलेलं “||आरण्यक||” हे “रत्नाकर मतकरी” यांचे पद्य बंधातील हे नाटक पुन्हा एकदा राहुल भंडारे यांनी अद्वैत संस्थेतर्फे रंगमंचावर आणले ते पुन्हा त्याच कलाकारांना घेऊन….
रसिकहो आजवर तुमच्या भरभरून मिळालेल्या प्रतिसादामुळे अद्वैत संस्थेने महाराष्ट्र शासन राज्य नाट्य पुरस्कार, झी गौरव, म. टा.सन्मान, संस्कृती कलादर्पण, आंतरराष्ट्रीय मिफ्टा पुरस्कार यांसारख्या अनेकविध पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली…. आज आपल्या पाठिंब्यामुळेच अद्वैत संस्थेचे सर्वेसर्वा राहुल भंडारे व्यावसायिक मराठी नाट्यनिर्माता संघाचे प्रमुख कार्यवाहक या पदावर कार्यरत आहेत….
निर्माता राहुल भंडारे नेहमीच अद्वैत संस्थेच्या च्या माध्यमातून वेगळे विषय आणि वेगवेगळ्या धाटणीची कलाकृती रसिकांसाठी रंगभूमीवर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत…. मायबाप रसिकहो तुमचं प्रेम आणि सदिच्छा कायम आमच्या सोबत असू द्या…

यंदा लवकर एक नवीन नाट्य पुष्प ‘चार्ली’ आपल्या भेटीला घेऊन येत आहोत..यामध्ये ‘भाऊ कदम’ प्रमुख भूमिकेत असून ‘अरविंद जगताप’ यांचे लेखन आणि ‘महेश मांजरेकर’ यांचे दिग्दर्शन आहे.. अद्वैत थिएटर आणि चंद्रलेखा या संस्था मिळून याची निर्मिती करणार आहेत.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns