थंडीच्या दिवसात सकाळी उठलं की, निसर्ग, आजूबाजूची झाडं, डोंगर सगळीकडेच धुकं असतं… डोळ्यांना दिसायला अगदी छान असतं… पण जसजसं ते धुकं कमी होत जात तसतसं आपल्याला भोवतालच्या गोष्टी अधिक स्पष्ट दिसू लागतात… कोणा व्यक्तीच्या प्रेमात पडलं की अगदी तसंच काहीसं होत नाही का ? कधीही न भेटलेली व्यक्ति आपल्याला आवडायला लागते आणि आपण नकळत त्याच्या प्रेमात पडतो… तिथून हळुवार फुलणार्या प्रेमकहाणीला सुरुवात होते… कधी लुकलुकत्या चांदण्यात तर कधी चंद्राच्या मंद प्रकाशात त्याचा हात हातात घेऊन आपण पुढच्या प्रवासाची स्वप्नं रंगवू लागतो… आपण त्या व्यक्तीच्या इतक्या प्रेमात पडलेलो असतो की, वास्तव्य समोर असून देखील आपण ते उघड्या डोळ्याने बघू शकत नाही किंवा दिसलं तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो… यात त्या प्रेमाचा दोष नसतो…त्यात दोष असतो तो निव्वळ आपला ! नशिबाचा ! आपला जीव ज्या व्यक्तिवर जडला आहे तो खरंच त्या विश्वासाच्या पात्र आहे का ? ज्या व्यक्तीच्या नावावर आपण आपल संपूर्ण आयुष्य करू पाहतो आहे तो आपल्या प्रेमाच्या पात्रतेचा आहे का ? या सगळ्या शंका, प्रश्न त्याक्षणी निरर्थक वाटतात… कारण आपलं प्रेम असतं ना त्या व्यक्तीवर… ते म्हणतात ना प्रेम एकदा तरी करून पहावे… पण हा विश्वास का एकदा तुटला की मग तो सगळा प्रवास एका मृगजळासारखा वाटू लागतो… असून नसल्यासारखं, डोळ्यांना दिसलं तरी समोर जाताच चकवा देणारं, दुरून अतिशय सुंदर तर जवळ गेल्यावर अस्तित्वात नसणारं…
अशीच हळुवार प्रेमकहाणी सुरू होते आपल्या स्वाती आणि श्रीधरमध्ये पण यांच्या कथेला रहस्याची किनार आहे… काय असेल हे रहस्य ज्यामुळे स्वातीचे आणि त्याचसोबत श्रीधरचे संपूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे… जाणून घेण्यासाठी नक्की बघा चिन्मय मांडलेकर लिखित आणि मुळाक्षर प्रॉडक्शन निर्मित ‘चंद्र आहे साक्षीला’ ११ नोव्हेंबरपासून सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. श्रीधरची भूमिका आपल्या सगळ्यांचा लाडका सुबोध भावे साकारणार असून स्वातीची भूमिका ऋतुजा बागवे निभावणार आहे…
आपल्या कथेतील स्वाती मध्यमवर्गीय, अतिशय सोशिक, साधी सरळ… ‘फसवणुकीवर उभं असलेलं नातं पत्याच्या बंगल्यापेक्षा तकलादू असतं’ असे तिचे म्हणणे आहे” आणि याचमुळे स्वभवाने चांगली असून देखील वयाच्या चौतीसाव्या वर्षी देखील स्वाती अविवाहित आहे… अशाच स्वातीच्या आयुष्यात श्रीधर नकळतपणे येतो आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जातं… दोघांमधील प्रेम हळूहळू फुलू लागतं… जसजसे दिवस पुढे सरकू लागतात एकमेकांवरच प्रेम आणि विश्वास वाढू लागतो…. आणि दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात… या दोघांचे आयुष्य नक्की कोणाच्या आणि कोणत्या रहस्याने पुर्णपणे बदलून जाणार ? स्वाती आणि श्रीधरच्या या पिक्चर परफेक्ट जगात नक्की काय घडणार ? हे लवकरच आपल्याला कळणार आहे …
मालिकेबद्दल बोलताना प्रमुख – मराठी टेलिव्हीजन, वायाकॉम18 चे दीपक राजाध्यक्ष म्हणाले, “नेहेमीपेक्षा काहीतरी वेगळं पण रसिक प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारं देण्याच्या प्रयत्नामधून ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेचा जन्म झाला… टेलिव्हीजन असो, चित्रपट असो वा आताचं सिरिज हे माध्यम असो मला असं वाटत आपण यापूर्वी देखील अनेक प्रेमकथा पाहिल्या ज्यांनी आपली मनं जिंकली… आणि अशाच वेळी काहीतरी नवीन घेऊन यावं अशी इच्छा झाली. दोन जीवांचा संसार विश्वासाच्या पायावर उभा असतो. प्रेम, वैर, स्वार्थ, समर्पण,वचनबद्धता अश्या अनेक नात्यांची वीण संबंधांमध्ये असते. पण याच नात्यात जेव्हा आपलाच कोणी व्यक्ती स्वत:च्या स्वार्थापोटी विश्वासघात करतो तेव्हा काय होतं ? हेच या मालिकेमधून वेगळ्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. ही गोष्ट नक्कीच प्रेक्षकांना आवडेल पण त्याहीपेक्षा खिळवून ठेवेल.
बर्याच काळानंतर सुबोध भावे पुन्हाएकदा छोट्या पडद्यावर येत आहे याचा आनंद आहे… प्रेक्षकांनी त्याला बऱ्याच भूमिकांमध्ये पाहिले आहे, त्याच्यावर भरभरून प्रेमं केल आहे. आम्हाला आशा आहे प्रेक्षक या वेळेसदेखील तसंच प्रेम करतील. फ्रेश जोडी आणि वेगळी प्रेमकथा यामुळे आम्हाला खात्री आहे की ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल”.
मालिकेचा निर्माता आणि लेखक चिन्मय मांडलेकर म्हणाला, ‘चंद्र आहे साक्षीला’ ही मुळाक्षर प्रॉडक्शन निर्मित पहिली मालिका आहे. मी आणि माझा मित्र सुप्रसिध्द दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आम्ही दोघांनी मिळून ही संस्था सुरू केली… लॉकडाउननंतर नव्या गोष्टी घेऊन पुन्हा यायचं असं जेव्हा कलर्स मराठी वाहिनीने ठरवलं तेव्हा त्यांनी आम्हाला ही संधी देण्याचे ठरवले त्यासाठी मी वाहिनीचा ऋणी आहे… या मालिकेच्या निमित्ताने माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट घडते आहे ती म्हणजे महाराष्ट्राचा सुपरस्टार, सुप्रसिध्द अभिनेता आणि माझा पहिला सहकलाकार सुबोध भावे सोबत इतक्या वर्षांनंतर निर्माता आणि अभिनेता या नात्याने आम्ही दोघं एकत्र येत आहोत… सुबोधने आजवर अतिशय चोखंदळपणे मालिकांची निवड केली आहे आणि हेच कारण असावं त्याने या मालिकेचा विषय, श्रीधरची भूमिका ऐकताच होकार दिला… मालिकेमधील इतर कलाकार देखील गुणी आहेत सगळ्यात महत्वाची आमच्या मालिकेची नायिका ऋतुजा बागवे उत्तम अभिनेत्री आहे… मालिकेमध्ये अनेक उत्तम कलाकरांची फौज आहे यासगळ्यांना घेऊन आम्ही प्रेक्षकांना एक चांगली गोष्ट सांगू पाहतो आहे. कलर्स मराठीसोबत गेल्या चार वर्षांपासून माझी ही सलग तिसरी मालिका आहे जीव झाला येडापिसा आणि राजा रानीची गं जोडी या मालिका मी लेखक म्हणून करत आहे, या दोन्ही मालिका प्रचंड गाजत आहे याचा मला आनंद आहे… ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल अशी आशा आहे”.
आपल्या भूमिकेविषयी आणि मालिकेविषयी बोलताना सुबोध भावे म्हणाला, “मालिकेविषयी सांगायच झालं तर मला असं वाटत ईच्छा असते पण ती पूर्ण करण्याचे प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. काही रुळलेल्या वाटा शोधतात तर काही स्वत:च्या निर्माण करतात”.
प्रेम ही अत्यंत सुंदर आणि हवीहवीशी वाटणारी भावना आहे…. काहींना मैत्रीत प्रेमं गवसतं, तर काहींना एका नजरेत, तर काहींची मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो. पण, प्रेमाच्या या हळुवार, सुंदर नात्याभोवती जेव्हा विश्वासघाताच कुंपण येतं तेव्हा माणसाची होरपळ सुरू होते. आपल्याच आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तिकडून तो झाला आहे याचा जेव्हा संशय येतो तेव्हा कशी ती व्यक्ति स्वत:ला सांभाळते आणि पुढे जाते ? हा प्रश्न समोर येतो. या मालिकेतील स्वाती आणि श्रीधरची प्रेमकथा काहीशी अशीच आहे… कसा असेल यांचा प्रवास ? असं कोणतं रहस्य आहे ज्याने या दोघांचे आयुष्य बदलून जाणार आहे? या हळुवार प्रेमकहाणीची सुरुवात होणार आहे तुमच्या साक्षीने तेव्हा नक्की बघा ‘चंद्र आहे साक्षीला’ ११ नोव्हेंबरपासून सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.