उपचाराचा गोल्डन अवर सुरु झाला असून, कोरोनाला दुसऱ्या टप्प्यातच संपवायचा आहे – मुख्यमंत्री

“रुग्णाला लवकर उपचार मिळाले तर त्याला जीवदान मिळते. त्याचप्रमाणे राज्यात आता कोरोना प्रतिबंधात्मक उपचाराकरिता गोल्डन अवर सुरु झाला असून त्याचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यातच संपवायचा आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज व्हावे” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
शनिवारी राज्यशासनाने जाहीर केलेल्या बंदी आदेशाबाबत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह, मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास आदी उपस्थित होते.

” कोरोनाची लागण टाळण्याकरिता संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक आहे. त्याकरिता राज्यशासनाने जनतेच्या हितासाठी काही पावले उचलली आहेत. स्थानिक प्रशासनाने जीवनावश्यक बाबी, पाणीपुरवठा, साफसफाई, आरोग्य व्यवस्था, औषध दुकाने, किराणा दुकान, भाजीपाला आदी सुरु राहील, याची खबरदारी घ्यावी. नागरिकांनी जनहिताकरिता घरीच थांबावे. असे आवाहनही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी केले.

आपण कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात असून पुढचे टप्पे टाळण्याकरिता काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. मात्र त्याचा फायदा हा राज्याला होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पुढचे दहा ते पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असून यंत्रणेने कायदा वापरताना त्याचा अतिरेक होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. रुग्णालयांवर अतिरिक्त ताण पडणार नाही याची काळजी घेतानांच ज्यांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलता येवू शकतात, अशा शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्यात. असेही त्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले ” जिल्हास्तरावर नागरिकांची समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्या विविध शंकांना उत्तर देण्यासाठी अधिकाऱ्याची नेमणूक करावी. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोनाची चाचणी सुविधा निर्माण करण्यात येत असून त्यासाठी दररोज पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns