देशाचा आज ७४ वा स्वातंत्र्यदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देश आज आंतकवाद आणि विस्तारवादाचा सामना जिद्दीने करत असून आमचे जवान काय करु शकतात, देश काय करु शकतो हे जगाने लडाखमध्ये पाहिले आहे असे म्हणत विस्तारवाद आणि पाकिस्तानच्या दहशतवादावर जोरदार प्रहार केला.
ज्यांनी गैरप्रकार करण्याचे धाडस केले त्यांना त्यांच्याच भाषेत समजेल असे प्रत्युत्तर दिले. देशाच्या संप्रभुतेच्या रक्षणासाठी संपूर्ण देश जोशाने भरला आहे आमच्या सामर्थ्यावर आमची अतूट श्रद्धा असून त्यासोबत देश पुढे जात आहे.
आपल्या शेजारी देशांशी अनेक शतकांपासून असलेले आपले आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध आणखी दृृढ करण्याचा भारताने नेहमी प्रयत्न केला आहे. दक्षिण आशियातील सर्व देशांच्या नेत्यांना या भागातील शांतता आणि विकासाची प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याचे मी आवाहन करतो, असे मोदी म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, देशात सध्या तीन- तीन लसी चाचणीच्या टप्प्यात आहेत. शास्त्रज्ञांकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन घेण्याची तयारी केली आहे.
आज जग इंटर-कनेक्टेड आहे. त्यासाठी परिस्थितीनुसार जगातील अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान वाढवायला हवे. त्यासाठी देशाला आत्मनिर्भर बनवायलाच हवे. आत्मनिर्भर भारताचा अर्थ केवळ आयात कमी करणे नाही. तर आपल्या सामर्थ्याच्या आधारावर आपले कौशल्य वाढविणे असा आहे.
आत्मनिर्भर कृषी आणि आत्मनिर्भर शेतकरी ही भारताची एक महत्वाची प्राथमिकता आहे अनेक बंधनातून मुक्त करण्याचे काम आम्ही केले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन सुरुवात होत असल्याची घोषणा केली. आजपासून देशात नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची सुरुवात होत आहे. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन देशाच्या आरोग्य क्षेत्रात नवीन क्रांती घडवेल. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.