माझ्या मनातील झेंडा तो हाच – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

आज बुधवार रोजी मनसेचे अधिवेशन गोरेगांव येथे संपन्न झाले या वेळेस मनसेने आपल्या झेंड्या मध्ये बदल केला असून संपूर्ण भगव्या रंगाच्या झेंड्यावर शिवमुद्रा असणार आहे तर निवडणुकीच्या काळात शिवमुद्रेच्या जागी इंजिनाचे चित्र असेल.

– मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

– “जमलेल्या माझ्या तमाम ‘हिंदू’ बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो……” म्हणत राज ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली.

– आपल्यातलेच अनेक जणं सोशल मीडिया, फेसबुक, ट्विटर ह्या सगळ्या माध्यमांचा वापर करून पक्षातील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करताना आढळतात, असले प्रकार ह्या पुढे मी खपवून घेणार नाही. असे प्रकार आढळले तर त्यांची पदावरून गच्छन्ति अटळ.

– ज्यांना निवडणुका लढवायच्या नाहीत पण पक्षाच्या संघटना बांधणीसाठी काम करायची इच्छा आहे अशा इच्छुकांनी स्वतःची नावं राजगड कार्यालयांत जाऊन नोंदवायची आहे. ह्यासाठी श्री. सुधीर पाटसकर आणि श्री.वसंत फडके हे संघटनात्मक मांडणीचं आणि बांधणीचं काम करणार आहेत.

– सरकारमधील जनतेच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित मंत्रिमंडळातील खात्यांवर लक्ष ठेवणारं ‘प्रतिरूप मंत्रिमंडळ (शॅडो कॅबिनेट)’ महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच घेऊन येणार.

– पक्षाच्या स्थापनेच्या वेळेस माझ्या मनात जो झेंडा होता तो झेंडा हाच आहे, ज्या झेंड्याचं आज अनावरण झालं. शिवसेनेचा जो आजचा झेंडा आहे तो आधी संयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा होता.

– पण स्थापनेच्या वेळेस मी ३८ वर्षाचा होतो तेव्हा अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं. ह्या पेक्षा काय वेगळं सोशल इंजिनिअरिंग असणार आहे?

– हा झेंडा आणावा हे माझ्या मनात गेले एक वर्ष घोळत होतं आणि माझा मूळचा डीएनए हाच आहे जो ह्या झेंड्याचा रंगाचा आहे. मग ठरवलं अधिवेशनाच्या निमित्ताने हा झेंडा समोर आणायचा.

– हा सर्वसाधारण झेंडा नाही ह्यावर महाराजांची राजमुद्रा आहे त्यामुळे त्याचा सन्मान राखणं ही आपली जबाबदारी आहे. निवडणुकीच्या वेळेस राजमुद्रेचा झेंडा वापरायचा नाही, त्याचा आब राखला गेलाच पाहिजे.

– झेंडा बदलणं ही काही नवीन गोष्ट नाही, ह्या आधी जनसंघाने देखील झेंडा आणि नाव बदललंच आहे. १९८० साली जनसंघाचं नाव भारतीय जनता पक्ष झालंच होतं की.

– मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे… मी धर्मांतर केलेलं नाही. पण एक सांगतो माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन.

– जे देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही.

– पण सरसकट कोणालाच माफी नाही, जर इथे येऊन धिंगाणा घातलात तर मी तुमच्या अंगावर जाईन. रझा अकादमीच्या आंदोलकांनी पोलीस भगिनींवर हात घातला तेंव्हा त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच होती.

– हिंदूंच्या सणांच्या विरोधात जेंव्हा कोणी बंदी आणायचा प्रयत्न केला तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच उभी राहिली आहे.

– धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्यांचा तुम्हाला त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही.

– माझं केंद्र सरकारला सांगणं आहे की समझौता एक्स्प्रेस बंद करा. आज देशात उभे राहिलेले मोहल्ले हे देशाला त्रास देणार. उद्या जर युद्ध झालं तर सैन्याला बाहेरच्या नाही तर आतल्या शत्रूंशीच लढावं लागेल.

– नरेंद्र मोदी जेंव्हा चुकले तेंव्हा मीच त्यांच्यावर टीका केली पण जेंव्हा त्यांनी चांगली गोष्ट केली तर त्यांचं अभिनंदन करणारा मीच होतो. कलम ३७० असो की राममंदिराचा विषय असो त्यांचं अभिनंदन करणारा मीच होतो.

– सीएए एनआरसी वर अचानक हजारोंचे मोर्चे निघायला लागले आणि हे मोर्चे का निघत आहेत तर कलम ३७० असो व राममंदिराचा सुप्रीम कोर्टाचा निकाल असो त्यावरचा राग रस्त्यावर मोर्चे काढून निघत आहे.

– राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असं होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो, माझी मत तीच आहे जी पूर्वीपासून आहे. रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही.

– आज सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे ह्या देशातील बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर मुस्लिम ह्या देशातून बाहेर हाकलून देण्याचा. ह्यासाठी केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा.

– आज राज्यात बाहेरच्या देशातून आलेले मौलवी हिंदुस्थानात काही ठिकाणी जाऊन देशविघातक कारवाया करत आहेत अशी माझी माहिती आहे आणि ह्या विषयावर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे.

– बांगलादेश आणि पाकिस्तानी घुसखोर मुसलमानांना देशाबाहेर हाकलून द्यावं ह्यासाठी येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चा काढणार आहे. सीएए आणि एनआरसी विरोधात निघणाऱ्या मोर्च्यांना उत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्च्याने देणार आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns