रंगभूमीवर पुन्हा एकदा गंधर्वयुग “संगीत बालगंधर्व”

बालगंधर्व हा प्रत्येक कलाकाराच्याच नव्हे तर प्रत्येक प्रेक्षकांच्या दृष्टीने एक कुतूहलाचा विषय. त्यात मराठी मन हे बालगंधर्व यांच्याविषयी एक हळवा कोपरा ठेवणारं ! एखादा देवलोकीचा गंधर्व खाली यावा आणि देवाने दिलेल्या आशीर्वाद व शापानुसार त्याने इथे आयुष्य कंठावे असे बालगंधर्व जगले. आपल्यासोबत घडणार्‍या घटनांची ना त्यांनी कधी दखल घेतली, ना त्याविषयी तक्रार केली. गंधर्वानी मराठी रंगभूमीला काही स्वप्ने दाखवली आणि ती सत्यात उतरवण्यासाठी स्वत: झटले. गंधर्वयुग हा मराठी रंगभूमीसाठी सुवर्णकाळ मानला जातो. गंधर्वांच्या संपूर्ण जीवनाचा वेध घेणारे संगीत नाटक आता लवकरच रंगमंचावर येत आहे. ‘अभिजात’ नाट्यसंस्था निर्मित “संगीत बालगंधर्व” हया नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग रविवार दि. १३ ऑक्टोबर, दुपारी १२ वाजता टिळक स्मारक मंदिर पुणे आणि शनिवार दि. १९ ऑक्टोबर, रात्रौ ८ वाजता श्री शिवाजी मंदिर दादर येथे संपन्न होणार आहे.

अभिजात’ ही तिसरी चरित्र निर्मिती ‘संगीत बालगंधर्व’
रसिकांना अर्पण करीत आहे. ज्येष्ठ लेखक अनंत शंकर ओगले लिखित हे सशक्त नाटक एकूण ३० कलाकारांच्या संचात रंगभूमीवर येत आहे. ‘संगीत बालगंधर्व’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षक गंधर्वांचे वैभव पाहण्यास संगीत नाटकांकडे वळेल अशी आशा निर्माते आकाश भडसावळे यांनी व्यक्त केली आहे.

बालगंधर्व, केशवराव भोसले, गणपतराव बोडस, नाना जोगळेकर, गोविंदराव टेम्बे, गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी, अन्नपूर्णा, हरी आत्या, गोहर, श्रीकृष्ण देशपांडे, भांडारकर आणि लक्ष्मी नारायण यांच्या भूमिका कोण साकारीत आहे याबद्दल मात्र गुप्तता ठेवण्यात आली आहे. तसेच अभिनेते अंशुमन विचारे यात प्रमुख भूमिकेत आहे. पण त्यांची भूमिका कोणती ? या प्रश्नांची उत्तरे प्रयोगाच्या दिवशी रसिकांना मिळतील. त्यासाठी तरी नाटक पहावंच लागेल. गंधर्व ज्यांना अन्नदाते म्हणत ते रसिक मायबाप या नाटकाला नक्कीच भरभरून प्रतिसाद देतील अशी आशा निर्माते व कलाकार यांनी व्यक्त केली आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns