*रंगभूमीवर ‘मी व्हर्सेस मी’*
*क्षितिश दाते ,शिल्पा तुळसकर, हृषिकेश जोशी एकत्र*
हल्ली नवे विषय, नव्या संहिता रंगभूमीवर सादर होत आहेत. नव्या वर्षात तर विनोदापासून गंभीर, आशयघन अशा वैविध्यपूर्ण विषयांच्या नाटकांचे शुभारंभ होताना दिसत आहेत. या मांदियाळीत आता अमरदीप आणि कल्पकला निर्मित ‘मी व्हर्सेस मी’ या नव्या नाटकाची मेजवानी नाट्यरसिकांना मिळणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता क्षितिश दाते, शिल्पा तुळसकर हृषिकेश जोशी हे मराठीतले तीन गुणी नट एकत्र आले आहेत. संजय जमखंडी यांचे लेखन दिग्दर्शन असलेल्या या नाटकाच्या निर्मितीची जबाबदारी भरत नारायणदास ठक्कर, प्रवीण भोसले यांनी सांभाळली आहे. सहनिर्माती शिल्पा तुळसकर आहेत. शनिवार २५ जानेवारीला सायंकाळी ५.३० वा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड आणि रविवार २६ जानेवारी सायंकाळी ५.३० वा. तुपे नाट्यगृह हडपसर ३० जानेवारी काशिनाथ नाट्यगृह ठाणे रात्रौ ८.३० वा. तर शुक्रवार ३१ जानेवारी दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले ४.०० वा. येथे या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग रंगणार आहेत.
‘मी व्हर्सेस मी’ हे नाटक गूढ आणि थरारक धाटणीच असलं तरी समाजातील काही संवेदनशील विषयावर आणि मानवी नात्यांवर भाष्य करतं. नाटकात विविध ठिकाण असल्यानं नाटकातली दृश्य रचना प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. या तीनही कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलंय. या तीनही कलाकारांना एकत्र पाहणं नाट्यरसिकांसाठी ट्रीट असणार आहे. या तिघांसोबत चिन्मय पटवर्धन महेश सुभेदार,दिनेश सिंह यांच्या भूमिका नाटकात आहेत. निखळ मनोरंजनसोबत आमच्या भन्नाट ट्यूनिंगची ट्रीट प्रेक्षकांना या चित्रपटातून मिळेल’, असा विश्वास या तीनही कलाकारांनी व्यक्त केला.
‘मी व्हर्सेस मी’ नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. संगीत समीर म्हात्रे तर ध्वनी मंदार कमलापुरकर यांचे आहे. गीतकार अभिषेक खणकर तर प्रकाशयोजना अमोघ फडके यांची आहे. वेशभूषा तृषाला नायक तर रंगभूषा जबाबदारी राजेश परब यांनी सांभाळली आहे. कार्यकारी निर्माता प्रणत भोसले असून सहाय्यक दिग्दर्शक संदेश डुग्जे आहेत. व्यवस्थापक प्रसाद खडके तर सूत्रधार दीपक गोडबोले आहेत.