२५ जानेवारीला संपन्न होणार ‘आर्यन्स सन्मान २०२४’ अंतिम पुरस्कार सोहळा…
*अशोक राणे आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे यांना विशेष पुरस्कार जाहीर…*
‘वारसा परंपरेचा… अभिमान संस्कृतीचा!’ या घोषवाक्यासह मनोरंजन विश्वातील मान्यवरांच्या कर्तृत्वाला सलाम आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी ‘आर्यन्स सन्मान’ पुरस्कार सोहळा सज्ज झाला आहे. राज्य सरकारनंतर रोख पुरस्कार देणारा ‘आर्यन्स सन्मान’ हा एकमेव पुरस्कार सोहळा आहे. यंदा नाटक आणि चित्रपट विभागांमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळणार असल्याचे संकेत घोषित झालेल्या नामांकनांवरून मिळत आहेत. यावर्षी कोणता कलावंत आणि कोणता चित्रपट ‘आर्यन्स सन्मान २०२४’च्या ट्रॅाफीवर आपले नाव कोरण्यात यशस्वी होणार हे जाणण्यासाठी सेलिब्रिटिंसोबतच रसिकही आतुरले आहेत. ‘आर्यन्स सन्मान २०२४’ पुरस्कार सोहळा शनिवार, २५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडणार आहे.
या सोहळ्यात नाटक आणि चित्रपटांसह कलाकार-तंत्रज्ञांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. याखेरीज दोन विशेष पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मागच्या वर्षी ‘आणखी एक मोहेंजो दारो’ या माहितीपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट समीक्षक, अभ्यासक, संशोधक, लेखक-दिग्दर्शक अशोक राणे यांना आर्यन्स सन्मान विशेष पुरस्काराने गौरविण्यात येईल. याशिवाय प्रायोगिक नाट्य चळवळीची पुरस्कर्ती संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे यांच्या कार्याचाही गौरव आर्यन्स सन्मान विशेष पुरस्काराने करण्यात येणार आहे. या वर्षापासून आर्यन्स सन्मान पुरस्कार सोहळ्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या कार्याचाही गौरव करण्यात येणार असून, पत्रकारांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
‘आर्यन्स सन्मान २०२४’ पुरस्कार सोहळ्यात मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या कलाकारांचा रंगीबेरंगी नृत्याविष्कार रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. यात वैदेही परशूरामी, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, पुष्कर जोग, अंकित मोहन, प्रथमेश परब, गिरीजा प्रभू, समृद्धी केळकर, श्वेता खरात, जुई बेंडखळे, अस्मिता चिंचाळकर या कलाकारांचा समावेश आहे. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि डॅा. श्वेता पेंडसे सांभाळणार आहेत.