कोण म्हणतं टक्का दिला?’ नाटक रंगभूमीवर…
अनिकेत विश्वासराव, प्रिया मराठे, सुबोध पंडे, संयोगिता भावे, राहुल पेठे, पल्लवी वाघ-केळकर अशी कलावंतांची तगडी टीम असलेले ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ हे नाटक आता रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार, २२ मार्च रोजी गडकरी रंगायतन येथे होणार आहे. ‘नवनीत प्रॉडक्शन’ निर्मित व ‘सुबोध पंडे प्रॉडक्शन्स’ प्रकाशित ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ या नाटकाच्या तालमी सध्या जोशात रंगल्या आहेत.
‘कोण म्हणतं टक्का दिला?’ या नाटकाचे लेखन संजय पवार यांनी केले असून, सुबोध पंडे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना, संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य, अजित परब यांचे संगीत व मंगल केंकरे यांची वेशभूषा या नाटकाला लाभली आहे. मृणालिनी पंडे, वैभव पाटील व अमोल परब हे या नाटकाचे सहनिर्माते आहेत. नितीन नाईक व दीपक जोशी हे या नाटकाचे सूत्रधार आहेत.
या नाटकाची संहिता मला खूप आवडली आणि माझी त्यात असलेली भूमिकाही आवडली. यातल्या माझ्या कॅरेक्टरचा ग्राफ खूप चांगला आहे. नाटकाची सगळी टीम उत्तम आहे. लेखक संजय पवार यांचे संवाद बोलणे ही सुद्धा एक पर्वणीच आहे आणि हे सर्वच या नाटकाच्या निमित्ताने जुळून आले आहे. त्यामुळे मी हे नाटक स्वीकारले आहे, असे मत अनिकेत विश्वासराव याने या नाटकाविषयी बोलताना व्यक्त केले.
‘कोण म्हणतं टक्का दिला?’ या नाटकात व्यावसायिक नाटकाला पूरक अशा सर्व बाबी आहेत. त्यामुळे मला हे नाटक जाणीवपूर्वक करावेसे वाटले. या नाटकामुळे एक वेगळा विषय व्यावसायिक रंगभूमीवर सादर केला जातोय आणि प्रेक्षक निश्चितच त्याचे स्वागत करतील असा आत्मविश्वास आहे. हे नाटक माझ्या अतिशय जवळचे नाटक आहे. कारण हे नाटक आम्ही १९९० मध्ये केले होते. त्यावेळी त्याचे बरेच प्रयोगही आम्ही केले होते. परंतु हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर यावे, असे माझे स्वप्न होते आणि ते आता पूर्ण होत आहे, अशा भावना निर्माते व दिग्दर्शक सुबोध पंडे यांनी व्यक्त केल्या.
+1
+1
+1
+1