“मुलांना जे आवडते त्या भाषेत मुलांना शिक्षण दिले गेले पाहिजे- शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘बालभारती’ची निर्मिती स्फीयरओरिजीन्सची तर दिग्दर्शन नितीन नंदन यांचे
यंदाच्या बालदिनी म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘बालभारती’च्या ट्रेलरचे प्रकाशन झाले. महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि विशेष निमंत्रित करण्यात आलेल्या दहा शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. दिग्दर्शक नितीन नंदन आणि निर्माते कोमल व संजय वाधवा तसेच चित्रपटातील सर्व प्रमुख कलाकार सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर, आर्यन मेंघजी व तंत्रज्ञ यावेळी उपस्थित होते.
अलीकडेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि टीझर दाखल करण्यात आले. त्याला समाज माध्यमांवर जो प्रतिसाद मिळाला तो उत्तुंग असा होता. समाज माध्यामांवर या टीझर तसेच मोशन पोस्टरवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. रसिकांनी त्यांवर अत्यंत कल्पक अशा प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. ‘बालभारती’मध्ये सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर, संजय मोने, उषा नाईक, आर्यन मेंघजी, रवींद्र मंकणी आणि अभिजित खांडकेकर यांच्या भूमिका आहेत.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की जरी तुम्हाला इंग्रजी येणे गरजेचे असले तरी इंग्रजी हे सर्वस्व नाही. “मुलांना जे आवडते त्या भाषेत मुलांना शिक्षण दिले गेले पाहिजे. आज जे देश तंत्रज्ञानात विकसित आहेत, त्यांनी त्यांच्या मातृभाषेत शिक्षण दिल्याचे दिसून येते. फ्रान्स विमान तंत्रज्ञानात पुढे आहे, पण ते फ्रेंच भाषेत बोलतात. मी पॅरिसमध्ये असताना रस्त्यावर मला कुणीही इंग्रजीत उत्तर दिले नाही. कदाचित त्यांना इंग्रजी येत असेल पण त्यांना त्यांच्याच भाषेचा आग्रह धरवासा वाटत असेल. आपल्याला इंग्रजी आली पाहिजेच, पण इंग्रजी हे काही सर्वस्व नाही,” ते म्हणाले. ट्रेलरचा शुभारंभ झाल्यावर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, कॉम्पुटर सायन्स हे भविष्य आहे. आम्ही आमच्या मुलांना सर्वोत्तम असे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यास कटिबध्द आहोत.”
बालदिनी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरलासुद्धा रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळू लागला आहे. रसिकांनी या चित्रपटाचा विषय हा आपल्याशी संबंधीत असल्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे. सिद्धार्थ जाधव आणि नंदिता पाटकर यांची पडद्यावरील केमिस्ट्री उत्तम आहे. पण तरीही ते आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल चिंतीत आहेत आणि त्याबद्दल त्यांच्यात वाद झडतात. ही कथा बालकलाकार आर्यन मेंघजी याच्यावर केंद्रित असली तरी रवींद्र मंकणी आणि उषा नाईक या ज्येष्ठ कलाकारांच्या भूमिकाही अत्यंत अर्थपूर्ण आहेत. ग्लॅमरस अभिजित खांडकेकर त्याच्या भूमिकेच्या माध्यमातून कथेत मोठ्या प्रमाणावर धमाल आणतो.
अत्यंत हलक्या फुलक्या वातावरणात घडणारा आणि अगदी गोड वाटणारा असा ‘बालभारती’चा ट्रेलर मुलांच्या खोड्यांनी सुरू होतो आणि प्रसन्न प्रसंगांच्या माध्यमातून पुढे सरकतो. चित्रपटातील कुटुंबामध्ये खूप चांगले बंध जुळलेले बघायला मिळतात पण कथा जसजशी पुढे सरकते तशा नाट्यमय घटना घडत जातात. पालकांमध्ये घरातील मुलाच्या शिक्षणाच्या संदर्भात मतांतरे झाल्याचे पाहायला मिळते. पण अभिजित खांडकेकरचा कथेत प्रवेश होतो आणि तो या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणवर आत्मविश्वास निर्माण करतो.तो मुलांना भाषा शिकत असताना खूप चुका करण्याची आणि त्यांतून शिकत जाण्याची संधी देतो. पण कथेतील मुलाची आजी जो अनुभवाचा सल्ला देते, तो खूपच महत्त्वाचा आहे. ती म्हणते, “पोराचं बालपण मात्र हरवता कामा नये.”
पुढे काय….? हा प्रश्न हा ट्रेलर पाहिलेल्या प्रत्येकालाच पडतो. या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आणि या सर्वांगसुंदर अशा चित्रपटाचा आस्वाद घेण्यासाठी मात्र तुम्हाला चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेपर्यंत म्हणजे २ डिसेंबर २०२२ पर्यंत वाट पहावी लागणार आहे.