भाऊसाहेब शिंदेच्या ‘रौंदळ’

भाऊसाहेब शिंदेच्या ‘रौंदळ’

आशयघन चित्रपटांसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अॅक्शन चित्रपटांची तशी वानवाच आहे. आता मात्र ही उणीव भरून काढण्यासाठी एक धडाकेबाज अॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून कुतूहल जागवणारा ‘रौंदळ’ हा अॅक्शनपट मराठीसह हिंदी प्रेक्षकांचंही मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ या चित्रपटानंतर ‘बबन’मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेब शिंदेंचा रुद्रावतार ‘रौंदळ’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी आणि भाऊ शिंदे यांनी ‘रौंदळ’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘रौंदळ’ चित्रपटाच्या रावडी पोस्टरनं प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण करण्याचं काम केल्यानंतर आता याचा लक्षवेधी टिझर रिलीज करण्यात आला आहे. गजानन पडोळ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. कोणताही संवाद नसलेला ‘रौंदळ’चा टिझर लक्ष वेधून घेणारा आहे. ‘रौंदळ’मध्ये धडाकेबाज अॅक्शन पहायला मिळणार असल्याचे संकेत रिलीज करण्यात आलेला टिझर देतो. पोस्टरवर दिसलेल्या भाऊसाहेबचं रौद्र रूप टिझरमध्येही दिसतं. गुंडांचा धुव्वा उडवणारा भाऊ यात दिसणार असून, तो टाळ्या-शिट्ट्यांचा वर्षावसाठी पात्र ठरणार आहे. भाऊसाहेबच्या या चित्रपटानं फर्स्ट लुक रिलीज झाल्यापासूनच उत्सुकता वाढवली आहे. यात आता टिझरचीही भर पडली आहे. ‘रौंदळ’चा थरारक टिझर प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा आहे. या चित्रपटात काहीतरी थरारक पहायला मिळणार याची चाहूल टिझर पाहिल्यावर लागते. या चित्रपटात भाऊसाहेबची जोडी कोणत्या अभिनेत्रीसोबत जमली आहे हे गुपित अद्याप उघड करण्यात आलेलं नाही. याखेरीज इतर कलाकारांची नावंही गुलदस्त्यात आहेत.

‘रौंदळ’च्या टिझरबाबत भाऊसाहेब म्हणाला की, ‘रौंदळ’ हा मराठीतील आधुनिक काळातील अॅक्शनपट आहे. यापूर्वी कधी न पाहिलेले अॅक्शन सीन्स या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. सुरुवातीपासून अखेरपर्यंत उत्सुकता वाढवणारं कथानक या चित्रपटाचा महत्वपूर्ण प्लस पॉइंट आहे. याला सुमधूर संगीताची जोड देऊन एक परिपूर्ण कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा ‘रौंदळ’च्या संपूर्ण टिमचा प्रयत्न आहे. गजानन पडोळ यांनी सुरेख दिग्दर्शन करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘रौंदळ’ बनवला असल्याचेही भाऊसाहेब म्हणाला.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns