समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब रुपेरी पडद्यावर विनोदी अंगानं सादर करत रसिकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झालेले दिग्दर्शक मिलिंद कवडे मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ‘एक नंबर’ असं टायटल असलेल्या या चित्रपटाच्या रूपात मिलिंद यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं फुल टू मनोरंजन करणारा चित्रपट बनवला आहे. ‘टकाटक’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर मिलिंद कवडे यांचा ‘एक नंबर… सुपर’ हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा असल्याचं मानलं जात आहे. टायटलप्रमाणेच एक नंबर कथानक असणाऱ्या ‘एक नंबर… सुपर’चा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज करण्यात आला आहे. ११ मार्च २०२२ रोजी ‘एक नंबर… सुपर’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘एक नंबर… सुपर’ या चित्रपटाची निर्मिती महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी धुमाळ प्रोडक्शनच्या बॅनरखाली आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगानं केली आहे. दिग्दर्शनासोबत ‘एक नंबर’ची कथा व पटकथा मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे, तर संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. काहीशा वेगळ्या जॅानरच्या माध्यमातून मनोरंजनाद्वारे एखादा विचार देणाऱ्या मिलिंद यांच्या कारकिर्दीतील ‘एक नंबर… सुपर’ हा आणखी एक वेगळ्या पठडीतील चित्रपट आहे. टायटलप्रमाणेच चित्रपटाचा ट्रेलरही ‘एक नंबर’ बनला आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये, श्रवणीय संगीत, मार्मिक संवाद, नयनरम्य लोकेशन्स आणि विषयाचं गांभीर्य अधोरेखित करणारा हा ट्रेलर तरुणाईसोबतच सर्वच वयोगटातील प्रेक्षकांच्या आकर्षणाचं केंद्र बनला आहे. या चित्रपटातील ‘बाबूराव…’ आणि ‘तुकडे तुकडे…’ ही गाणी अगोदरच पॅाप्युलर झाली असून याचा फायदा ट्रेलर आणि त्या अनुषंगाने ‘एक नंबर… सुपर’लाही नक्कीच होणार आहे.
‘टकाटक’नंतर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी मिलिंद यांनी पुन्हा एकदा प्रथमेश परबचीच निवड केली आहे. त्यामुळं या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना पुन्हा एकदा मिलिंद-प्रथमेश जोडीची केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. प्रथमेशच्या जोडीला यात मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा ढावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी अशी भलीमोठी मराठी कलाकारांची फौज आहे, जी प्रेक्षकांचं मनसोक्त मनोरंजन करणार आहे. संजय नवगिरे आणि सुनिल मगरे या चित्रपटाचे पटकथा सहाय्यक आहेत. सिनेमॅटोग्राफर हजरत शेख (वली) यांच्या नजरेतून हा चित्रपट पहायला मिळणार आहे. अभिनय जगताप यांनी या चित्रपटाचं बँग्राऊंड म्युझिक दिलं असून, संकलनाची जबाबदारी प्रणव पटेल यांनी सांभाळली आहे.