नवीन वर्षात मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिनाच घेऊन आले आहेत. एका पेक्षा एक चित्रपट प्रदर्शित होत असतानाच त्यात आता भर पडणार आहे एका भव्य चित्रपटाची. ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’ असे जबरदस्त चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिल्यानंतर प्रसाद ओक आता ‘चंद्रमुखी’ हा बहुचर्चित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट २९ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
टिझरमध्ये ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि साजशृंगार, सौंदर्याची नजाकत आणि सोबत दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगना दिसत आहे. तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आणि राजकारणात मुरलेला ध्येयधुरंदर राजकारणी यांच्यात निर्माण होणारी ओढ.पाहायला मिळत आहे. लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची ही राजकीय रशीली प्रेमकहाणी प्रेक्षकांना ‘चंद्रमुखी’मध्ये पाहायला मिळणार आहे.
‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय – अतुल यांनी ‘चंद्रमुखी’ला संगीत दिले आहे. या चित्रपटातील ‘चंद्रमुखी’आणि इतर कलाकारांची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहेत.