सोशल मीडिया या अत्यंत प्रभावी माध्यमाने दैंनदिन व्यवहारातील सर्वच क्षेत्रे व्यापली आहेत.
तरुणांबरोबरच लहान मुले तसेच वयस्कर माणसेही या माध्यमांपासून दूर राहू शकलेली नाहीत. सोशल मीडियाने प्रगतीची वेगवेगळी दारे आज खुली केली असली तरी या माध्यमांच्या चुकीच्या व अतिरेकी वापरामुळे गंभीर समस्या समाजात निर्माण होत आहेत. सोशल मीडियाच्या याच फसवणुकीला बळी ठरलेल्या एका मध्यमवर्गीय गृहस्थाची कहाणी सांगणारा एस.एम बालाजी प्रोडक्शन’ प्रस्तुत ‘इमेल फिमेल’ हा चित्रपट १७ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे.
एका ईमेलमुळे झालेला त्रास व त्या ईमेलमागचे गुपित घरच्यांना कळू नये यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरत व त्यातून होणारा मनोरंजक घटनाक्रम म्हणजेच ‘ईमेल फिमेल’ हा चित्रपट. आजची पिढी एकमेकांशी ‘कनेक्ट’ राहण्यासाठी इमेल, फेसबुक, व्हॉटसअप् सारख्या समाजमाध्यमांचा वापर करते. अनेक गोष्टींची माहिती या माध्यमांद्वारे पुरवली जाते. अशाच माहितीतून काय घडू शकते हे मनोरंजक पद्धतीने दाखवताना सोशल साइट्सचा योग्य वापर केला, तर फायदा आहे अन्यथा आपण अडचणीत यायला वेळ लागणार नाही हे लक्षात आणून देणारा हा चित्रपट आहे.
सोशल मीडिया हे माहितीचे देवाणघेवाण करणारे माध्यम आहे. पण ही माहिती किती खरी किती खोटी आहे याचा अंदाज न बांधता आल्यामुळे दिशाभूल करण्याचा प्रकार वाढतोय. सगळं कळतंय पण वळत नाही अशी सध्या सोशल मिडीयाच्या आहारी गेलेल्यांची स्थिती आहे. पण या सगळ्याचा वेळीच विचार केला नाही तर काय घडू शकते? हे दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिग्दर्शक योगेश जाधव सांगतात.
निखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन या कलाकारांच्या ‘इमेल फिमेल’ चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा भक्ती जाधव यांची आहे. संवाद भक्ती आणि योगेश जाधव यांनी लिहिले आहेत. छायांकन मयुरेश जोशी तर कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड आणि अभिजीत नार्वेकर यांनी संगीताची तर पार्श्वसंगीताची जबाबदारी प्रकाश नर यांनी सांभाळली आहे. वेशभूषा सुहास गवते आणि देवयानी काळे यांची आहे. कार्यकारी निर्माते स्वप्नील वेंगुर्लेकर आहेत. निर्मिती सल्लागार अविनाश परबाळे आहेत.
१७ डिसेंबरला ‘इमेल फिमेल’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.