‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’चा गीत ध्वनीमुद्रणाने मुहूर्त

मराठी सिनेसृष्टी पुन्हा एकदा नव्या जोमानं गरुडभरारी घेण्यासाठी सज्ज झाल्याचं चित्र सध्या सर्वत्र पहायला मिळत आहे. एकीकडे चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा घोषित होत असल्यानं लवकरच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत, तर दुसरीकडे नवीन चित्रपटांचे मुहूर्तही दिमाखदार शैलीत संपन्न होत असल्यानं चित्रपटसृष्टीत नवचैतन्य पसरल्याची जाणीव होत आहे. नुकताच ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. गीत ध्वनीमुद्रणानं ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या चित्रपटाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे.

पराग भावसार टच या बॅनरखाली निर्माते पराग भावसार ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अंधेरी येथील पंचम स्टुडिओमध्ये निर्माते-दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार आणि गायकांच्या प्रमुख उपस्थितीत ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’चा मुहूर्त करण्यात आला. यावेळी ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ हे टायटल साँग रेकॅार्ड करण्यात आलं. गीतकार श्रीकृष्ण राऊत यांनी लिहिलेलं हे टायटल ट्रॅक वैशाली माडेनं आपल्या सुमधूर आवाजात गायलं आहे. संगीतकार दिनेश अर्जुना यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक पराग भावसार आहेत. प्रेमकथा असलेल्या या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक भावसार एक सशक्त मेसेजही देण्याचा प्रयत्न करणार आहेत. ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या शीर्षकावरून ही लव्हस्टोरी एका वेगळ्याच पातळीवरील सत्य उलगडणारी असल्याचं सांगण्यात येत आहे.

लव्हस्टोरी असल्यानं हा चित्रपट तरुणाईला खुणावेल, पण त्यासोबत इतर वयोगटातील प्रेक्षकांचंही लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करत भावसार म्हणाले की, लव्हस्टोरी हा रसिकांचा आवडता विषय असल्यानं आजवर बऱ्याच प्रेमकथा चित्रपट रूपात समोर आल्या आहेत. या चित्रपटात मात्र यापूर्वी कधीही न पाहिलेलं प्रेम आणि त्या प्रेमाची अनोखी गुलाबी कथा असेल याची खात्री बाळगा. अनोख्या शैलीत खुलत जाणाऱ्या या गुलाबी लव्हस्टोरीला तितक्याच सुमधूर संगीताची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या टायटल ट्रॅकनं या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आल्यानंतर पुढे जबाबदारी खूप वाढली आहे. या चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांसमोर एक दर्जेदार कलाकृती सादर करण्याचा आमच्या सर्व टीमचा प्रयत्न असल्याचंही भावसार म्हणाले. या चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. प्रसिद्ध डिओपी महेश आणे यांच्या नजरेतून ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ हा चित्रपट पहायला मिळणार आहे. राहुल भातणकर या चित्रपटाचा संकलक असून, कोरिओग्राफी प्राण हंबर्डे करत आहे. कथानकाला साजेशा कलाकारांची निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे. कलाकार फायनल झाल्यावर लगेचच शूटिंगला सुरुवात करण्याची योजना आखण्यात आली आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns