आतापर्यंतचा इतिहास असा आहे, की वडील मुलाला चित्रपटसृष्टीत आणतात, त्याच्यासाठी चित्रपट निर्मिती करतात. पण अनिल धकाते आणि सचिन धकाते पिता-पुत्राची गोष्ट काहीशी वेगळी आहे.
विद्युत अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या अनिल धकाते यांनी शासकीय सेवेत उच्च पद भुषवले आहे. चित्रपट किंवा कला क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांच्या मनात या क्षेत्राविषयी कुतुहल आणि प्रेम होते. चित्रपटात एकदा तरी काम करावयास मिळावे असे त्यांची मनोमन इच्छा होती त्यांची ही इच्छा त्यांच्या मुलाने म्हणजेच सचिन धकाते यांनी अनिल धकाते साठी चित्रपट बनवून पूर्ण केली.
सचिन यांनी वडलांसाठी “खिचिक” या चित्रपटाची निर्मिती केली असून, अनिल धकाते “खिचिक”मध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
पराग जांभुळे, अमितकुमार बिडला चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. प्रीतम एसके पाटील यांनी या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे.
‘आपल्याकडे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण आहे. मात्र, मुलाने माझ्यातील अभिनय गुण किंवा या क्षेत्राविषयीची आवड ओळखली होती. त्यामुळे माझ्यासाठी चित्रपट निर्मिती करण्याची त्याची इच्छा होती. खिचिकची संहिता त्याच्याकडे आल्यावर त्यातल्या आजोबांच्या भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली. व्यक्तिरेखा फार उत्तम आहे. त्याला संवेदनांचे विविध पदर आहेत. व्यक्तिरेखा अशिक्षित असताना माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाने ही व्यक्तिरेखा जिवंत वाटण्यासाठी त्यात जीव ओतणे महत्त्वाचे होते. त्यामुळे माझ्यासाठी ही व्यक्तिरेखा आव्हानत्मकच होती. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी मोठा अनुभव देणारी कार्यशाळाच होती. सिद्धार्थ जाधव, सुदेश बेरी, प्रथमेश परब यांच्यासारख्या कसलेले कलाकार चित्रपटात आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. या चित्रपटामुळे माझ्यासारख्या नवकलाकारासाठी नवे दालन खुलं झालं झालं आहे,’ अशी भावना अनिल धकाते यांनी व्यक्त केली.