नवरात्रीचे नवरंग उधळणार पिकलचं ‘अंबे मां’

आश्विन शुद्ध प्रतिपदा जवळ येत असल्यानं जणू निसर्गासोबतच अखिल मानवजातीला नवरात्रीचे वेध लागले आहेत. प्रतिपदेच्या दिवशी माता सिंहासनी विराजमान होताच नवरात्रींचा जागर सुरू होणार आहे. वर्षभरातील सणांपैकी एक असलेल्या नवरात्रोत्सवाची अबालवृद्ध आतुरतेनं वाट पहात असतात. रसिकांची हिच आवड जोपासत तरुणाईसोबतच सर्वांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल म्युझिकनं एक नवं कोरं गाणं रसिकांच्या भेटीला आणलं आहे. ‘अंबे मां’ हे मातेची महती वर्णन करणारं हे गाणं सर्व वयोगटातील रसिकांना दांडियाच्या तालावर थिरकायला लावणारं आहे.

शारदा प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘अंबे मां’ या गाण्याची निर्मिती वीर कुमार शाह यांनी केली आहे. नवरात्र येताच सर्वत्र दांडियाचा खेळ रंगू लागतो आणि संपूर्ण वातावरण नवरसाच्या नऊ रंगांनी रंगून जातं. रसिकांचा नवरात्रोत्सवातील आनंद द्विगुणित करण्यासाठी दिग्दर्शक योगेश भोसले यांनी पिकल म्युझिकसाठी ‘अंबे मां’ हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या योगेश यांनी या निमित्तानं एक सुंदर गाणं रसिक दरबारी सादर केलं आहे. वृषभ शाह आणि अंकिता राऊत या मराठी मनोरंजन विश्वातील उदयोन्मुख कलाकारांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. पुण्यातील वाकड परिसरातील नयनरम्य आणि आलिशान लोकेशनवर शूट करण्यात आलेल्या या गाण्यात वृषभ आणि अंकितासह शंभरहून अधिक डान्सर्स आणि आर्टिस्टनी परफॅार्म केलं आहे. मुराद तांबोळी यांनी हे गाणं लिहीलं असून, पी. शंकरम यांनी गायलं व संगीतबद्ध केलं आहे. चिन्नीचेतन, सागर भोंदवेनं हे गाणं कोरिओग्राफ केलं आहे.

हे गाणं म्हणजे अंबे मातेची भक्ती आणि भक्तांचा आनंद यांचं मिश्रण असल्याची भावना व्यक्त करत योगेश भोसले म्हणाले की, मागील दीड वर्षांपासून सर्वच सणांवर अवकळा पसरलेली असताना, मरगळ आलेली असताना नवसंजीवनी देणारं एक भक्तीमय गीत अंबे मातेच्या भक्तांसाठी तयार करावं या उद्देशानं हे गाणं बनवलं आहे. केवळ धमाल मस्ती न करता त्यासोबतच अंबेमातेची भक्तीही या गाण्याद्वारे करण्यात आल्यानं तरुणाईसोबतच सर्वांचेच पाय या गाण्याच्या तालावर आपोआप थिरकतील. सहजसुंदर शब्दरचना, सुमधूर संगीतरचना, सुरेल गायन, नेत्रसुखद नृत्य आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांचा समावेश असणारं हे गाणं रसिकांना नक्कीच आवडेल अशी आशाही भोसले यांनी व्यक्त केली आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns