आजची तरुणाई म्हणजे बिनधास्त, बेधडक, बेफिकीर वृत्ती असलेली. त्यांच्या विचार आणि आचारांमध्येही हे जाणवतं. मग ते वास्तवात असो, वा रुपेरी पडद्यावार… हीच गोष्ट अचूक हेरून बनवण्यात आलेलं एका मराठी सिनेमाचं नवं मोशन पोस्टर नुकतंच आपल्यासमोर आलं आहे. एखाद्या टेररबाज सिनेमाच्या मोशन पोस्टरकडून ज्या अपेक्षा असतात, त्या सर्व हे पोस्टर पूर्ण करतं. मोशन पोस्टरच्या सुरुवातीला तरुणाईला भुरळ घालणाऱ्या लाऊड म्युझिकसह हायलाईट झालेली नावं समोर येतात, हिंदीतील किंवा हॉलीवूड मधल्या एखाद्या सिनेमाप्रमाणं ती एका मागोमाग एक पुढे सरकतात, त्यानंतर विजेच्या वेगानं धावू पाहणाऱ्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या एखाद्या स्पोर्टस बाईकचा आवाज आणि लाऊड म्युझिकसह नायकाचं नाव झळकतं, अखेरीस मोटरसायकल, हॅार्न आणि संगीताचा मेळ साधत येतं सिनेमाचं टायटल…. ‘टर्री’
सिनेमाची अशी अनोखी झलक पाहिल्यावर एखाद्या हॉलीवूडपटाची आठवण होणं साहजिकच आहे. ‘टर्री’ हा आगामी मराठी सिनेमाही यापेक्षा वेगळा नसून, पुन्हा एकदा मराठीत काहीतरी नावीन्यपूर्ण बनत असल्याची नांदी आहे. शीर्षकापासून सादरीकरणापर्यंत सर्वच पातळीवर हा सिनेमा नाविन्याची जाणीव करून देणारा आहे. सिनेमाचं टायटल ‘टर्री’ म्हणजे नेमकं काय? हा मोशन पोस्टर पाहिल्यावर पडणारा पहिला प्रश्न… इथपासूनच सिनेमा खऱ्या अर्थानं विचार करायला लावणारा ठरतो. ‘टर्री’ म्हणजे काय तर बेधडक. जबरदस्त ऊर्जा असलेला, सळसळत्या रक्ताचा तरुण, जो बेफिकीर, बेधडक आहे. काहीही करण्याची धमक असलेला, टेररबाज वृत्तीचा, वेळप्रसंगी समाजाच्या विरुद्ध जाऊन बंडखोरी करण्याची ताकद अंगी असलेला एखादा डॅशिंग तरुण म्हणजे ‘टर्री’… विशेषत: ग्रामीण भागात अशाप्रकारच्या बोलीभाषेतील शब्दाचा वापर केला जातो. एखादा बेधडक तरुण दिसला की, त्याला ‘टर्रीबाज’ म्हटलं जातं. त्यामुळंच मराठीतील या धडाकेबाज ‘टर्री’ सिनेमाचं मोशन पोस्टर प्रथमदर्शनीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
मराठी सिनेसृष्टीतील सध्याचा आघाडीचा डॅशिंग स्टार ललित प्रभाकर ‘टर्री’ सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. ‘ऑन युव्हर स्पॉट प्रॅाडक्शनने ‘प्रियामो एन्टरटेन्मेंट’च्या सहयोगानं ‘टर्री’ची निर्मिती केली आहे. प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील आणि विक्रम धाकतोडे या सिनेमाचे निर्माते आहेत. महेश रावसाहेब काळे यांनी आपल्या काहीशा रांगड्या शैलीत या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. पुढील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची निर्मिती संस्थेची योजना आहे.