रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी ‘मराठी भाषा शिक्षण वर्ग अभियान’; परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि ‘ कोकण मराठी साहित्य परिषद राज्यव्यापी दौरा !
महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक अत्यंत स्तुत्य आणि अनोखे अभियान हाती घेण्यात आले आहे. ‘अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकाला मराठी भाषा शिक्षण वर्ग अभियान’ अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात विविध दौऱ्यांचे आयोजन करून चालकांना मराठी भाषेचे विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.
जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या या राज्यव्यापी दौऱ्यात अनेक नामवंत साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि समन्वयक सहभागी होणार आहेत.
या अभियानांतर्गत होणाऱ्या दौऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
*दौरा क्रमांक १* (६ आणि ७ जुलै २०२६)
*शहरे: संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि सोलापूर.*
मार्गदर्शक व समन्वयक: महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष तथा ‘कोमसाप’चे कार्याध्यक्ष डॉ. प्रा. प्रदीप ढवळ हे या दौऱ्याचे मुख्य समन्वयक म्हणून धुरा सांभाळतील. त्यांच्यासोबत कोमसापच्या समन्वयक सल्लागार डॉ. ज्योती ठाकरे, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हर्षला लिखिते, आनंद विश्व गुरुकुल कॉलेज ऑफ लॉ चे प्राचार्य ॲड. सुरेश प्रधान आणि जवाहर पुरोहित (विशेष सहभाग) हे मार्गदर्शन करतील.
*दौरा क्रमांक २* (१० जुलै २०२६)
*शहरे: नाशिक आणि मालेगाव.*
मार्गदर्शक: डॉ. ज्योती ठाकरे (समन्वयक सल्लागार, कोमसाप) आणि डॉ. हर्षला लिखिते (प्राचार्य, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय).
*दौरा क्रमांक ३* (१३ आणि १४ जुलै २०२६)
*शहरे: पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली आणि कोल्हापूर.*
मार्गदर्शक: डॉ. ज्योती ठाकरे (समन्वयक सल्लागार, कोमसाप) आणि डॉ. हर्षला लिखिते (प्राचार्य, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय)
*दौरा क्रमांक ४* (१३ ते १६ जुलै २०२६)
*शहरे: नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला.*
मार्गदर्शक: कोमसापच्या सचिव प्रा. दीपा ठाणेकर आणि ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अनुपमा उजगरे.
अभियानाचा उद्देश:
राज्यात येणाऱ्या प्रवाशांशी संवाद साधताना अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांची मराठी भाषा अधिक प्रभावी, सन्मान्य आणि सुलभ व्हावी, तसेच त्यांच्यात मराठी भाषेविषयी आदर आणि आत्मियता वाढीस लागावी हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. परिवहन विभाग आणि साहित्यिक क्षेत्रातील नामवंत संस्था ‘कोमसाप’ यांच्या या एकत्र येण्यामुळे या अभियानाला मोठे यश लाभेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील सर्व अमराठी रिक्षा-टॅक्सी चालक बांधवांनी आणि संबंधित संघटनांनी या शिक्षण वर्गांचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन विभाग, मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.





























