नवीन नाटकाचे रंगभूमीवर ‘शिक्कामोर्तब’………
खूप कमी माणसे अशी असतात, जी कुठलाही शिक्का न घेता आपल्या उत्तुंगपणावर शिक्कामोर्तब करतात. या आणि अशा काही गोष्टींवर प्रकाश टाकत विनोदी ढंगात आणि रसिकांच्या आनंदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी एक नवीन नाटक रंगभूमीवर येण्यास सज्ज झाले आहे. हे नाटक म्हणजे ‘शिक्कामोर्तब’. या नाटकात सागर कारंडे, कांचन पगारे, भक्ती रत्नपारखी, अनिशा सबनीस हे कलाकार भूमिका साकारत आहेत. या कलाकारांच्या चाहत्यांसाठी हे नाटक म्हणजे पर्वणीच आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार, १२ जून रोजी दुपारी ४ वाजता विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे.
‘तरंगिणी एंटरटेनमेंट’ आणि ‘नवनीत’ निर्मित या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्रमोद शेलार यांनी केले आहे. नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले असून, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. वलय मुळगुंद यांची गीते आणि अभिजीत पेंढारकर यांचे संगीत या नाटकाला लाभले आहे. चंदर यांनी रंगभूषा व दर्शना चौधरी यांनी या नाटकासाठी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. महेंद्र खराडे हे या नाटकाचे निर्मिती प्रमुख आहेत. सध्या या नाटकाच्या तालमी मोठ्या उत्साहात सुरू आहेत.

या नाटकाबद्दल सागर कारंडे म्हणतो, “माझ्या या नवीन नाटकासाठी मी खूप उत्सुक आहे. दोन जोडप्यांच्या आयुष्यात घडणारी ही कहाणी आहे. हे नाटक विनोदी ढंगाचे आहे आणि ते रसिकांना नक्कीच आवडेल”.
भक्ती रत्नपारखी म्हणते, “मला पहिल्या वाचनामध्येच हे नाटक खूप आवडले. रिहर्सल करताना मला खूप मजा येत आहे. मी आत्ताच हे नाटक एन्जॉय करत आहे. प्रेक्षकही नाटक रंगभूमीवर नक्कीच एन्जॉय करतील”.
नाटकाचे लेखक व दिग्दर्शक प्रमोद शेलार म्हणतात, “ही एक खरी कहाणी आहे आणि तिला थोडेसे ट्विस्ट करून आम्ही रंगमंचावर आणत आहोत. हे नाटक ‘हिट’ असण्यावर लोक नक्कीच शिक्कामोर्तब करतील. सागर कारंडे, भक्ती रत्नपारखी, कांचन पगारे, अनिशा सबनीस असे कलाकार यात काम करत आहेत आणि विनोदाचे उत्कृष्ट टायमिंग असणारे हे कलाकार आहेत. त्यामुळे हे नाटक रसिकांना नक्कीच आवडेल, असा मला विश्वास आहे”.






























