‘अश्वत्थामा’ वय वर्ष ८४…..
तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे फक्त ८४ वय! हो, मात्र ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या नाटकात ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ अश्वत्थामाची भूमिका करत असून त्यांचे वय आहे ८४ वर्ष.
८४ व्या वर्षी साकारली अश्वत्थाम्याची व्यक्तिरेखा…
नाटककार, कादंबरीकार, दिग्दर्शक, अभिनेते अशी अशोक समेळ यांची ओळख आहे. आता ते वयाच्या ८४ व्या वर्षात आहेत आणि आता त्यांनी रंगभूमीवर महाभारतातील ‘अश्वत्थामा’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांच्या निमित्ताने महाभारतातील अश्वत्थामा आता रंगभूमीवर आला आहे. ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या नाटकाच्या माध्यमातून ही व्यक्तिरेखा आता रंगमंचावर दिसत आहे. अलीकडेच या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मोठ्या उत्साहात सादर झाला. आता १८ मे रोजी बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे.

अशोक समेळ यांच्या ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या संपूर्ण भारतभर गाजलेल्या कादंबरीवरच ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ हे नाटक आधारित आहे. ‘ऋग्वेद’ या नाट्यसंस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अशोक समेळ यांनी केले आहे. नाटकाचे प्रोजेक्टर नेपथ्य विश्वास पिंपळे यांनी केले असून, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. नाटकाला संग्राम समेळ यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. अशोक समेळ व धनश्री दामले या नाटकात भूमिका साकारत आहेत.
महाभारतातील ‘अश्वत्थामा’ आणि त्याचे चिरंजीवित्व हा आजही उत्सुकतेचा विषय राहिला आहे. अश्वत्थामा कोण होता, तो अजून काहीजणांना दिसतो; असे अनेक प्रश्न त्याच्याविषयी आजही विचारले जातात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या नाटकात मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सध्या या नाटकाचे प्रयोग धडाक्यात रंगभूमीवर सुरु झाले आहेत. अश्वत्थाम्याविषयी कुतुहूल असणाऱ्या प्रत्येकासाठी हे नाटक म्हणजे मोठी पर्वणी ठरत आहे.
या नाटकाविषयी अशोक समेळ म्हणतात, “या विषयावर मी गेली २५ वर्षे अभ्यास आणि संशोधन केले आहे. ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ ही माझी महाकादंबरी २०१५ या वर्षी आली, तिच्या ९ आवृत्त्या निघाल्या आणि आता मी त्यावर नाटक लिहिले आहे. या कादंबरीवर नाटक करावे, अशी इच्छा माझ्याजवळ अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे आता मी हे नाटक करायला घेतले आहे”.































