*‘मास्टर’ मोहन आगाशे आणि ‘ब्लास्टर’ सिद्धार्थ जाधव एकत्र*
*’आतली बातमी फुटली’ चित्रपटात दिसणार वेगळ्या अंदाजात*
नेमक्याच तरीही प्रभावी भूमिका करण्याकडे ओढा असणाऱ्या कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव ही नावे आवर्जून घेतली जातात. आतापर्यंत मोजक्या पण हटके चित्रपटांमध्ये दिसणारे हे दोन चतुरस्त्र कलाकार दिग्दर्शक विशाल पी.गांधी यांच्या ‘आतली बातमी फुटली’ या आगामी मराठी चित्रपटातून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येत आहेत. या दोघांचं एक पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ज्यात मोहन आगाशे यांनी सिद्धार्थ जाधव याच्यावर बंदूक रोखलेली पाहायला मिळतेय. या मागचं नेमकं कारण काय असेल ? हे पाहण्यासाठी ६ जूनला येणारा ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट पाहावा लागेल.
एखाद्या बातमीमागे असलेल्या गोष्टीचा शोध लावण्यासाठी बातमीच्या मुळाशी जावे लागते. वेळप्रसंगी जीवावर उदार होऊन बातम्या मिळवाव्या लागतात. ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटात अशा कोणत्या बातमीचं रहस्य फुटणार आहे? हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे. या पोस्टरवरून या चित्रपटाविषयी निश्चित उत्कंठा निर्माण झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आता विविध प्रयोग होताना दिसत आहेत. ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटातील आमची केमिस्ट्री प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील, असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला.
आपल्या वीजी फिल्म्स बॅनरखाली विशाल पी. गांधी यांच्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनात त्यांना जैनेश इजरदार यांची सहदिग्दर्शक म्हणून साथ लाभली आहे. ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सह निर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवादलेखन जीवक मुनतोडे व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहे. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओजने ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे.