क्रिकेटच्या देवाचं मुंबईत शिल्प
पुढच्या आठवड्यात एक नोव्हेंबर रोजी मुंबईत एक जंगी इव्हेंट होणार आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियम इथे सध्या चाललेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यानच हा इव्हेंट होतोय. भारतीय क्रिकेटचं दैवत मानलं जातं अशा भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होतंय…
सचिनचं हे शिल्प म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वयाची पन्नाशी गाठणाऱ्या सचिनला दिली जाणारी ही अनमोल भेट आहे. तब्बल चौदा फूट उंचीच्या ब्राॅंझमध्ये घडवलेल्या या शिल्पात बॅटिंग करतानाचा सचिनचा एक क्षण गोठवला गेला आहे. हे शिल्प घडवलं आहे नगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी.
या कलाकाराचं नाव स्वतः सचिनंच सुचवलं हे विशेष. याचं कारण असं की सचिनच्या घरातल्या संग्रहात प्रमोद कांबळे यांनी घडवलेल्या कलाकृती आहेत. त्यामुळे हा कलाकार सचिनच्या परिचयाचा होता. या शिल्पाची गंमत अशी की हे शिल्प घडवायची योजना दहा वर्षापूर्वी आखली गेली होती. सचिनला आणि शिल्पकार कांबळे यांना वेळ ठरवून भेटी, चर्चा करुन अखेर हे शिल्प पूर्ण झालं… प्रमोद कांबळे यांनी नगरमधल्या त्यांच्या स्टुडिओत हे शिल्प घडवलं…
अधूनमधून सल्ला देण्यासाठी सचिनचा भाऊ येऊन शिल्प पाहून जात असे, त्याचा शिल्प घडवताना मोठा उपयोग झाला असं प्रमोद कांबळे यांनी बोलून दाखवले.
– श्रीराम खाडिलकर
(सोबतच्या फोटोत शिल्पकार प्रमोद कांबळे, सचिनचं शिल्प आणि सचिनचा भाऊ दिसत आहेत.)
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –