‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाहीर साबळे यांच्या जीवनावर तयार होत असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर ‘ या चित्रपटाच्या मोशन पोस्टर चे बुधवारी अनावरण केले. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
महाराष्ट्र शासनाने शाहीर साबळे यांनी गायलेल्या आणि अजरामर ठरलेल्या जय जय महाराष्ट्र माझा…. या गीताला नुकताच राज्यगिताचा दर्जा देत असल्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ” शाहीर साबळे यांचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्वाचा वाटा आहे. हा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून अधोरेखित होणार आहे. हा एक ऐतिहासिक ठेवा ठरणार आहे आणि त्यामुळे ही चित्रपटनिर्मिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.”
‘महाराष्ट्र शाहीर’शी अनेक रंजक आणि आश्चर्यकारक गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. नातवाने आजोबांवरील म्हणजे केदार शिंदेने त्याचे आजोबा शाहीर साबळे यांच्यावरील चित्रपट दिग्दर्शित करण्याचा चित्रपटसृष्टीतील एक दुर्मिळ योग यात जुळून आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाहिरांचा नातू केदार शिंदे याने केले आहे.
पोस्टरच्या प्रदर्शनानंतर बोलताना केदार म्हणाला, “सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातला बुलंद आवाज, अवघ्या महाराष्ट्राचा मराठी कणा म्हणजे ‘शाहीर साबळे’. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच त्यांचे झंझावाती आयुष्य तळागाळातील प्रत्येक रसिक प्रेक्षकाने अनुभवलं पाहिजे. शाहिरांच्या या जीवनपटातून लोककला, लोकनाट्य, लोकसंगीत चंदेरी पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील घरा-घरात सह्याद्रीच्या या सिंहाचा आवाज गरजणार आहे. याचीच एक झलक देण्यासाठी ‘महाराष्ट्र शाहीर’चे मोशन पोस्टर सादर करत आहोत.”