“अजूनी” चित्रपटातून उलगडणार परग्रहवासीयांची गोष्ट
सायफाय कथानक असलेला चित्रपट म्हणून साकार राऊत दिग्दर्शित अजूनी या चित्रपटाची चर्चा आहे. अतिशय उत्कंठावर्धक अशा या चित्रपटाचं टीजर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं असून, हा चित्रपट ८ जुलैला प्रदर्शित केला जाणार आहे.
संघर्षयात्रा, शिव्या असे उत्तम चित्रपट केलेला दिग्दर्शक साकार राऊत एक अनोखी कथा अजूनी या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर सादर करत आहेत.अर्थ स्टुडिओज यांच्या संयोगाने सारा मोशन प्रा.लि. आणि गोल्डन पेटल्स फिल्म्स यांनी “अजूनी” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिनेता पियुष रानडे, प्रणव रावराणे, श्वेता वेंगुर्लेकर, प्रतीक देशमुख यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. साकार राऊत यांच्या आजवरच्या चित्रपटांपेक्षा “अजूनी” हा चित्रपट खूपच वेगळा ठरणार आहे. चित्रपटाचा विषय आणि कथानक अतिशय वेगळं असल्याचं, सायफाय कथानकाला प्रेमाचा पदर असल्याचं टीजरमधून दिसून आलं होतं. आता चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर करतानाच टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं.
“अजूनी” या चित्रपटात एलियनची अर्थात परग्रहवासीची गोष्ट मांडण्यात आली आहे. नदीच्या मधोमध होडीत बसून घाटाकडे पाहणारा तरूण टीजर पोस्टरमध्ये दिसत आहे. तसंच चित्रपटाचा लूक आणि फील अतिशय इंटरेस्टिंग वाटतो आहे. त्यामुळे नावातलं आणि कथानकातलं वेगळेपण चित्रपटातही नक्कीच दिसेल यात शंका नाही.