जंगलाच्या पाऊलवाटेत शूटिंगचा साहसी अनुभव
वातानुकुलित स्टुडिओमध्ये चित्रीकरण करण्यापेक्षा मोकळ्या हवेत, हिरवळीने वेढलेल्या आणि मोकळ्या आसमंता खाली काम करण्याचा अनुभव काही वेगळाच असातो. तेवढाच तो आव्हानात्मक असतो. दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या मराठी – कन्नड सिनेमाचं शूटिंग कर्नाटकात वेगवेगळ्या भागात सुरु आहे. मग ते रामगढच पठार असेल किंवा उडुपी जवळच हेबरी, चिकमंगलोर जवळचं बाबा भूदानगिरी, प्रत्येक लोकेशन वेगवेगळे होते. घनदाट जंगल, चढ उतारचा ट्रेक, नक्षल भागाचे आव्हान अशा वेगवेगळ्या परिस्थितीत या सिनेमाचं शूट झाले आहे. सिनेमाच्या कथेसाठी लोकेशनमध्ये अजिबात तडजोड केली नाही. ४-५ महिने दिग्दर्शकांनी या सिनेमाच्या लोकेशनसाठी रेकी केली आहे. अनेक कठिण परिस्थितीत या सिनेमाचं शूटिग पार पडले. त्यात दाक्षिणात्य स्टार कवीश शेट्टीचा पाय फ्रॅक्चर झाल्याने एक महिना शूटिंग थांबवावे लागले. त्याबद्दल कवीश सांगतो, ‘’पायाला दुखापत झाल्याने माझ्यासाठी हे शूट सोपे नव्हते. मात्र, पायाला दुखापत होऊनही मी शूटिंग केले. कारण, कलाकारांच्या आरामापेक्षा टेक्निकल टीमची मेहनत ही महत्वाची होती. अशा डोंगराळ आणि खडकाळ भागात कॅमेरा आणि इतर सर्व उपकरणे नेणे खूपच अवघड होते.”
अभिनेता विराट मडकेने सांगितले, ‘’निसर्गाच्या सानिध्यात शूटिंगचा अनुभव खूप भारी होता तेवढाच एडव्हेंचरस होता. मला स्वतःला चिकमंगळूर जवळचा बाबा भूदान गिरीचा इथल लोकेशन खूप आवडलं. आम्ही पहाटे ४-५ वाजता उठून लोकेशन वर जायचो. मूळ शहरापासून ५० किमी वर हे लोकेशन असायचं. लोकेशन वर पोहचून
मग १५ – २० मिनिटांचा ट्रेक करायचा होता. एवढे चालल्यानंतर समोर दिसायचे निसर्गरम्य दृष्य आणि त्या वातावरणाने सगळा शिणवटा निघून जायचा. या सगळ्यात उत्तम सिनेमाचा भाग असल्याचे समाधान होतं.” तर शिवानी सुर्वेसाठी हा अनुभव न विसरता येण्यासारखा होता. माझ्यासाठी हा कधी न विसरता येणारा अनुभव होता. मी पहिल्यांदाच अशा प्रकारे जंगलात जाण्याचा अनुभव घेतला होता. मी ट्रेकिंगवाली मुलगी मुळीच नाही आहे. एका ठिकाणी तर शूटिंग लोकेशनला जाण्यासाठी दोर पकडून खाली उतरायचं होतं. काही वेळा व्हॅनिटीही नव्हत्या. त्यामुळे सेटवरही कधी दगडावर, तर कधी झऱ्याशेजारी आम्ही बसलो होतो. त्यामुळे पुढचे अनेक वर्ष मी हा अनुभव विसरणार नाही.”
‘’करिअरच्या सुरुवातीला शूटिंगचा असा अनुभव मिळाल्याने खूप समाधान आहे, आणि त्यात सहकलाकार इतके चांगले असल्याने हा प्रवास सोपा झाला. एरवी जंगलात जाणे वेगळे आणि कामासाठी तिथे वावरण्यात वेगळाच अनुभव आहे”, असं अश्विनी चावरेने सांगितले.
हा चित्रपट प्रेक्षकांनाही खास अनुभव देऊन जाईल. तसंच या कथेचा आणि लोकेशनचा काय संबंध आहे हे लवकरच कळेल. दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्टरी च्या या सिनेमात कन्नड कलाकार कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके आणि अश्विनी चावरे दिसून येणार आहेत. तर याचे दिग्दर्शन सदागरा राघवेंद्र करत आहेत.