१४ जानेवारीला चाखता येणार प्रेमाची लज्जतदार कॉफी

वाफाळत्या कॉफीचा घोट आणि त्याचा अद्भुत सुगंध प्रत्येकाचा दिवस रम्य करून टाकत असतो. कॉफीला स्वत:चा असा ‘प्यारवाला FC’ अंदाज आहे. एखाद्या जीवलगासोबत जिची साथ हवीहवीशी वाटते ती आपली लाडकी सखी…. ‘कॉफी’. कॉफीचा काळसर तपकिरी रंग, थोडीशी कडवट चव ही कित्येकांचा ‘वीक पॉइंट’ बनून जाते. प्रेमाची अशीच तजेलदार *‘कॉफी’* घेऊन अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, कश्यप परुळेकर, अभिनेत्री स्पृहा जोशी १४ जानेवारीला सिनेमागृहात येतायेत.

‘तन्वी’ फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले असून कैलास सोरारी आणि विमला सोरारी या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रेमाचे वेगवेगळे अनुभव प्रत्येकजण घेत असतो. अशाच काहीशा कटू-गोड अनुभवाच्या प्रेमाची लज्जतदार गोष्ट *‘कॉफी’* चित्रपटात पहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या आकर्षक पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

चित्रपटाची कथा-पटकथा मच्छिंद्र बुगडे यांची असून संवाद मच्छिंद्र बुगडे आणि नितीन कांबळे यांनी लिहिले आहेत. संकलन राहुल भातणकर यांनी केले असून छायांकन आय गिरिधरन यांनी केले आहे. गीते अशोक बागवे, नितीन कांबळे यांनी लिहिली आहेत. संगीत तृप्ती चव्हाण यांचे आहे. कलादिग्दर्शन हरीश आईर यांचे आहे. कार्यकारी निर्माते संजय कांबळे आहेत.

IPRoyal Pawns