१९४ दिवसात ३०१ पारितोषिके पटकाविणारी सोन्याहून पिवळी ‘काळी माती’

मराठी चित्रपटांच्या यादीत सद्यपरिस्थितीत सर्वांचे लक्ष वेधून घेणारा चित्रपट म्हणजे काळी माती. लॉकडाऊन सदृश परिस्थितीत चित्रीकरण पूर्ण करून डिसेंबर अखेरीस पासून ‘काळी माती’ या चित्रपटाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग सुरू झाला आणि केवळ १९४ दिवसात ३०१ सर्वोत्कृष्ट पारितोषिके या चित्रपटाने कमावली आहेत.

निर्माते-दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांचा ‘काळी माती’ हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रगतशील आणि आदर्श शेतकरी श्री. ज्ञानेश्वर बोडके यांच्या यशोगाथेवर आधारित असून शेतीसाठी जीव की प्राण मेहनत करून जवळजवळ ४०० कोटींची आर्थिक उलाढाल करणा-या शेतक-याची स्फूर्ती आणि प्रेरणादायी कहाणी घराघरात पोहोचावी आणि शेतक-यांच्या आत्महत्या थांबाव्यात या उद्देशानेच सदरहू चित्रपटाची निर्मिती केली गेली आहे. शेतक-यांच्या मूलभूत समस्या, बँकांचे आणि सरकारचे शेतक-यांविषयीचे धोरण यावर उत्कट भाष्य करणारा हा सिनेमा आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यशस्वी घौडदौड सुरू असताना या चित्रपटाने १९४ दिवसांत ३०१ सर्वोत्कृष्ट पारितोषिके मिळविली आहेत. यातील ६१ पारितोषिक या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांना दिग्दर्शनासाठी मिळाली आहेत. भारत, सिंगापूर, मलेशिया, फ्रान्स, युरोप, लंडन, अमेरिका इत्यादि जगभरातील कानाकोप-यात होणा-या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाने आपली मोहोर उमटवली असून ही घौडदौड अशीच पुढे सुरू राहणार आहे. एकूण ३५१ सर्वोत्कृष्ट पारितोषिक मिळावीत यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांनी यावेळी सांगितले. “१९४ दिवसांत ३०१ पुरस्कार’’ हा विश्वविक्रम आहे आणि यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड शी संपर्क साधला असून लवकरच त्यांच्याकडून प्रमाणपत्रे मिळण्याची शक्यता असल्याचे यावेळी दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांनी स्पष्ट केले.

सांगितिक क्षेत्रात ‘शोमॅन ऑर्गनायझर’ म्हणून जगविख्यात असलेले श्री. हेमंतकुमार महाले यांचा निर्माता-दिग्दर्शक म्हणून ‘काळी माती’ हा दुसराच चित्रपट असून या चित्रपटामध्ये ओमप्रकाश शिंदे, एतशा संझगिरी, दीक्षा भोर, भगवान पाचोरे, पूनम पाटील, पी. के. वाघमारे आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अविनाश-विश्वजीत यांचे सुरेल संगीत, छायाचित्रकार सुरेश सुवर्णा आणि राजा फडतरे यांचे सुरेख छायाचित्रण, अनिल राऊत आणि हेमंतकुमार महाले यांचे भारदस्त संवाद, मयूर आडकर यांची पटकथा आणि अतिशय सुरेख अशी लोकेशन्स यामुळे या सिनेमाचा दर्जा उंचावला असून अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांनी याची दखल घेतली आहे. लवकरच ‘काळी माती’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns